पुणे – करोनाबाधितास लक्षणे नसतील आणि त्याच्या घरी क्वारंटाइन होण्यासाठी स्वतंत्र खोली, संडास, बाथरूमची सोय असेल तर त्या ठिकाणी रुग्णाला त्याच्या स्वत:च्या हमीपत्रावर ठेवले जाते. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी त्याच्या संपर्कात राहतात. परंतु, पालिकेच्या असे मोबाइल नंबरच होमक्वारंटाइन असलेल्यांकडून “स्पॅम’मध्ये टाकले जात आहेत. बोलणे टाळले जात असल्याने अशा रुग्णांची दररोज माहिती घेणे अवघड जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य सेवेच्या नावाने ओरडून खासगी रुग्णालयांमध्ये धाव घेणारे नागरिक “होमक्वारंटाइन’ असताना मात्र आरोग्य यंत्रणेचे मोबाइल नंबर “स्पॅम’मध्ये टाकत आहेत. यामुळे त्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने घेतल्या जात असलेल्या फॉलपमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, “होमक्वारंटाइन’ असलेल्यांकडून असा प्रकार होणे दुर्दैवाची बाब मानली जात आहे.
स्वत:च्या हमीपत्रावर “होमक्वारंटाइन’ असलेल्यांना आरोग्य यंत्रणेकडून दररोज कॉल केले जातातख, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते. घरी असताना बाधिताला काही त्रास झाला किंवा त्याची प्रकृती गंभीर झाली तर त्वरित त्याला पुढे ऍडमिट करण्याची प्रक्रिया केली जाते किंवा तो स्टेबल असेल तर लक्षणे वाढू नयेत यासाठी औषधोपचार केले जातात.
याशिवाय परदेशातून आलेल्या नागरिकांना विमानतळावरच क्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. सुरूवातीला त्यांची सोय हॉटेल्समध्ये करण्यात येत होती.
मात्र, आता बहुतांश नागरिक घरीच क्वारंटाइन होतात, अशा नागरिकांनाही कॉल केले जातात. परंतु, महापालिकेचे हे महत्त्वाचे कॉल अनेकांना “इरिटेटिंग’ वाटत आहेत आणि त्यांनी हे नंबर्स “स्पॅम’ नंबर्समध्ये टाकले आहेत. त्यामुळे ते नंबर त्यांच्याकडून “रिसीव्ह’ केले जात नाहीत. महापालिकेने सोय केली तरी प्रश्न आहे आणि नाही केली तरी त्यांच्या नावाने ओरड केली जाते. मात्र, अशाप्रकारे प्रतिक्रिया देणे हे दुर्दैवी आहे.