शाहिरी आणि गाण्यांतून प्रबोधन करणाऱ्या महादेव जाधव यांची निवड
पुणे – महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 साठी सफाई सेवक महादेव जाधव यांची “ब्रॅंड ऍम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केली.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित केलेल्या “स्वच्छ सर्व्हेक्षण 2020′ या स्पर्धेत महापालिकेने सहभाग घेतला आहे. सर्व्हेक्षणासाठी “ब्रॅंड ऍम्बेसिडर’ म्हणून पालिकेचे सफाई सेवक असलेले महादेव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सफाई सेवक महादेव जाधव हे गेली 20 वर्षे रस्त्यावर झाडू मारणे, कचऱ्याने भरून वाहणारे कंटेनर आवरणे, ड्रनेज साफ करणे, अशी कामे करताना शाहिरी आणि गाण्याच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करतात. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता तो महापालिकेच्या यंत्रणेला द्यावा, प्लॅस्टिकचा वापर करू नये, अशा अनेक विषयांवर ते विविध प्रकारची रोचक गीते तयार करून प्रबोधन करतात. तसेच मानवनिर्मित कचऱ्याची समस्या, कचरा निर्मूलन प्रक्रिया, त्यात येणाऱ्या अडचणी, या अडचणीतही स्वत:चा जीव, आरोग्य जोखमीत टाकून काम करणारे सफाई सेवक या घटकावर आधारित “लक्शुमी’ या माहितीपटातही जाधव यांनी भूमिका केली आहे. या माहितीपटास यावर्षी अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून जाधव यांची स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 “ब्रॅंड ऍम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर मोहोळ यांच्या हस्ते सोमवारी जाधव यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विरोधीपक्षनेते दिलीप बराटे, कॉंग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.