पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात माहिती लपविल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तपास करून कोथरूड पोलिसांनी 16 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करावा, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
याबाबत कोथरूड परिसरातील रहिवासी डॉ. अभिषेक हरदास यांनी यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल केला होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शपथपत्रात माहिती लपवल्याचे हरदास यांनी दाव्यात म्हटले होते.
पाटील यांनी शपथपत्रात उत्पन्नाचे स्रोत तसेच त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाले आहे किंवा नाही, याबाबतची माहिती लपवल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयात दावा दाखल केला, असे डॉ. हरदास यांनी सांगितले.