डॉक्टरांअभावी महापालिकेचे तीन दवाखाने बंद ठेवण्याची नामुष्की
पुणे – बदलत्या वातावरणामुळे शहरात साथीच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच डॉक्टरच उपलब्ध नसल्याने महापालिकेचे तीन दवाखाने बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर शनिवारी ओढवली आहे. आरोग्य विभागात आधीच जवळपास 50 टक्क्यांहून अधिक रिक्त जागा आणि त्यातही बहुतांश डॉक्टरांनी वर्षाअखेरीस सलग टाकलेल्या रजा यामुळे हे नियोजन कोलमडले आहे. दरम्यान, एका रुग्णालयात गोंधळ झाल्याने आरोग्य विभागाने तेथे तात्काळ डॉक्टर पाठवून रुग्ण तपासणीचे नियोजन केले.
शहरात महापालिकेचे 63 दवाखाने असून त्यात प्रसृतिगृहे तसेच रुग्णालयांचाही समावेश आहे. मात्र, या सर्व ठिकाणी उपचारासाठी केवळ 97 डॉक्टर आहेत. तर आरोग्य विभागाकडे सुमारे 500 हून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टरांच्या संख्येवरच दैनंदिन नियोजन केले जाते. डिसेंबरचे शेवटचे दोन आठवडे असल्याने अनेक डॉक्टरांनी शनिवार- रविवार असे दिवस जोडून घेत रजा टाकल्या आहेत.
परिणामी, शनिवारी बिबवेवाडी येथील शंकर महाराज दवाखाना, येरवडा येथील कर्णे दवाखाना तसेच केदारीनगर येथील छत्रपती शाहू महाराज दवाखान्यात डॉक्टरच नसल्याचे सकाळी ही सेवा बंद ठेवावी लागली. तर आलेल्या रुग्णांना डॉक्टर नसल्याचे कारण देत सोमवारी येण्यास सांगण्यात आले. दरम्यान, ही बाब लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाने काही तासानंतर येरवडा येथील कर्णे दवाखान्यात एका डॉक्टरला तातडीने पाठवण्यात आले. मात्र, इतर दोन दवाखाने शासकीय कामकाज सुरू असतानाही बंद ठेवण्याची वेळ आली.
30 डॉक्टर प्रशासकीय कामांसाठी
शहरातील सुमारे 10 लाखांहून अधिक नागरिक महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेतात. मात्र, त्या तुलनेत डॉक्टर तसेच दवाखान्यांची खूपच कमी आहे. त्यामुळे उपलब्ध यंत्रणेचा वापर करताना आरोग्य सेवेवर मोठा ताण येत आहे. ही पदे भरण्यासाठी पालिकेने शासनाकडे वारंवार विनंती केली असली, तरी त्यास काहीच प्रतिसाद दिला जात नाही. आरोग्य विभागाने जवळपास 30 हून अधिक डॉक्टर प्रशासकीय कामांसाठी जुंपले आहेत. त्यात क्षेत्रीय आरोग्य अधिकारी म्हणून 4, गर्भलिंग निदान तपासणीसाठी 4, तर आता क्षयरुग्ण प्रकल्पासाठी 5 डॉक्टर नेमले आहेत. शिवाय, शहरी गरीब योजना तसेच इतर विभागांच्या कामासाठीही डॉक्टर नेमण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेची सर्व प्रसूतीगृहे तसेच इनडोअर पेशंट ठेवण्याची सुविधा असलेल्या प्रमुख रुग्णालयांसह इतर सर्व दवाखान्यातही डॉक्टर कमी पडत आहेत.