पवनानगर – मावळ तालुक्यातील सहा वर्षांच्या रुद्रप्रताप प्रमोद बोराडे या चिमुकल्याने अत्तापर्यंत 114 दुर्ग सर केले आहेत. चिमुकल्या रुद्रप्रतापने सर केलेल्या या दुर्गांमुळे त्याचे त्याचे कौतुक होत आहे. त्याने नुकतीच पूर्ण रायगडाला प्रदक्षिणा घातली आहे. महाराष्ट्रातील उंच, बेलाग आणि बलाढ्य दुर्ग रुद्रप्रतापने लीलया सर केलेले आहेत. वासोटा, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, रायगडासारखे गड त्याने सर केले आहेत. रायगड सारख्या अफाट विस्तीर्ण माथा असलेल्या दुर्गास संपूर्ण 16.2 किलोमीटरची प्रदक्षिणा त्याने पार पाडली. दोन वर्षांचा असताना त्याने शिवनेरी दुर्ग सर केला आणि सहाव्या वर्षांत त्याने रायगड प्रदक्षिणा घेतली.
शिवरायांची भक्ती उरात ठेवून दुर्ग मार्गावर कायमच महाराजांच्या नावाचा जयघोष करत रुद्रप्रताप सर्वांना प्रोत्साहित देखील करत असतो. अवघड गणली जाते अशी रायगड प्रदक्षिणा पूर्ण करावयास 8 – 9 तास लागतात. नदी-नाले, ओढे, कातळकडे, दऱ्याखोऱ्याची वाट व घनदाट अशा वनाच्या साक्षीने ही प्रदक्षिणा त्याने घेतल्यानंतर रायगड वाडी आणि हिरकणी वाडीच्या नागरिकांनी त्याचा सन्मान करून प्रोत्साहित केले.
वयाच्या 11 व्या वर्षांत पदार्पण करण्याआधी महाराष्ट्रातील संपूर्ण दुर्ग पाहण्याचा मानस आहे. सर्वांनी महिन्यातून दोन रविवार तरी गडावर गेलेच पाहिजे, असे रुद्रप्रताप सांगतो. “आपापल्या पाल्यांना इतिहास, अध्यात्म व आपली संस्कृती – परंपरा समजण्यासाठी त्यांना शिवचरित्राचे प्राथमिक संदर्भ म्हणजे दुर्ग दाखवा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक मंगल प्रसंग गडकोटांच्या साक्षीने पूर्ण करावा, असे रुद्रप्रतापच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.