सोनम परब
हॉलीवूडचे आकर्षण, ही वेगळी गोष्ट आहे आणि तिथे स्वतःच्या कर्तृत्वाने मोठी भूमिका मिळविणे वेगळे, हे अनेक बॉलीवूडकरांच्या लक्षातच आलेले नाही.
हॉलीवूडमधील “द मॅट्रिक्स’ या ऍक्शनपटाच्या चौथ्या भागाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. प्रियंका चोप्राने या चित्रपटात भूमिका केलेली असल्यामुळे भारतीयांच्या दृष्टीने ते प्रमुख आकर्षण आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका चोप्रा हॉलीवूड चित्रपटांमध्ये सातत्याने दिसू लागली आहे. क्वांटिको किंवा बेवॉच यांसारख्या बड्या प्रकल्पांत महत्त्वपूर्ण भूमिका केल्यानंतर प्रियंकाने हॉलीवूडमधील कारकीर्दच अधिक महत्त्वाची मानली आहे.
“द मॅट्रिक्स’सारख्या गाजलेल्या चित्रपटसाखळीत प्रियंकाचे नाव पाहून भारतीयांना आनंद झाला होता; परंतु ट्रेलरमध्ये ती अगदीच ओझरती दिसल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. या चित्रपटात तिची भूमिका अगदीच छोटी असून, त्यासाठीच का तिने एवढा आटापिटा केला? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
परंतु हॉलीवूडमध्ये जाऊन अशा छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये समाधान मानणाऱ्या भारतीय अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची संख्या काही कमी नाही. “स्लमडॉग मिलेनियर’मध्ये भूमिका करणाऱ्या अनिल कपूर यांच्यापासून अनेक अभिनेत्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटांत हजेरी लावली आहे. अर्थात “स्लमडॉग’मध्ये काम करण्यापूर्वी नायक म्हणून अनिल कपूर यांची बॉलीवूडमधील कारकीर्द जवळजवळ आटोपली होती, असेच म्हणावे लागेल.
“स्लमडॉग’मधील भूमिकेनंतर बॉलीवूडमध्ये अनिल कपूर यांना पुन्हा आमंत्रणे येऊ लागली; परंतु त्यांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या होत्या. बॉलीवूड आता त्यांच्या प्राधान्यक्रमात नव्हते. हॉलीवूडची प्रशंसा ते जमेल त्या मंचांवरून करू लागले होते. अनिल कपूर यांच्या या अतिमहत्त्वाकांक्षेविषयी लोक दबक्या आवाजात का होईना, चेष्टेचा सूर लावू लागले होते.
होता-होता एके दिवशी टॉम क्रूझबरोबर अनिल कपूर भूमिका करणार आणि तीसुद्धा “मिशन इम्पॉसिबल’च्या चौथ्या भागात अशी बातमी आली आणि अनिल कपूर हे पूर्णपणे आंतरराष्ट्रीय स्टार बनले आहेत, यावर या बातमीने जणू शिक्कामोर्तबच केले. माध्यमे अनिल कपूर यांचे भरभरून कौतुक करू लागली.
आज ज्या प्रकारे प्रियंकाच्या “द मॅट्रिक्स’चा ट्रेलर लॉंच झाला, तसाच “मिशन इम्पॉसिबलचा’ झाला तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसला, कारण अनिल कपूर यांचे स्थान त्या चित्रपटात कोपऱ्यातीलच होते. काहीजणांना तर अनिल कपूर यांचा चेहरा पाहण्यासाठी ट्रेलर दुसऱ्यांदा पाहावा लागला, तेव्हा ते दिसले असे सांगितले जाते. या चित्रपटापूर्वी अनिल कपूर यांच्या अतिआत्मविश्वासाची खिल्ली का उडवली गेली, याचे उत्तर त्यावेळी लोकांना समजले.
सर्वांत मोठी थट्टा तर अजून बाकी होती. कारण अनिल कपूर यांचा रोल प्रत्यक्षात मोठा असून, चित्रपटातील रहस्य उघड होऊ नये म्हणून त्यांची केवळ झलकच ट्रेलरमध्ये दिसली, असे सांगितले गेले. त्यामुळे थट्टामस्करी करणाऱ्यांनी चित्रपट येईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला. तथापि, चित्रपट झळकल्यावर अनिल कपूर यांच्या टीकाकारांना नव्याने बळ मिळाले; कारण त्यांची भूमिका खरोखरच अगदी किरकोळ होती.
त्यावेळी थट्टेने असेही म्हटले गेले की, अनिल कपूर यांची भूमिका एवढी छोटी होती की, नेमके त्यांच्या एन्ट्रीच्या वेळी जे पॉपकॉर्न आणायला गेले, त्यांना चित्रपटात अनिल कपूर होते, हे समजलेही नाही. हॉलीवूडच्या नशेत असलेल्या अनिल कपूर यांच्यावर “हॉलीवूडचा मॅकमोहन’ होण्याची वेळ आली आहे, असेही बोलले गेले.
आता लोकांच्या मनात प्रश्न असे होते, की आपली भूमिका एवढी छोटी आहे, हे अनिल कपूर यांना ठाऊकच नव्हते की काय? चित्रपटाच्या निर्मात्यांनीच त्यांना अंधारात ठेवले होते की काय? की भरपूर शूटिंग केल्यानंतर त्यांच्या भूमिकेला कात्री लावली गेली? परंतु आपला रोल ऐनवेळी कमी केल्याबद्दल अनिल कपूर यांनी कधीच तक्रार केली नाही.
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांची भूमिका अशा वेळी पटते. हॉलीवूडमधून त्यांनाही ऑफर्स येणे स्वाभाविकच होते; परंतु बॉलीवूडमध्ये ज्या तोलामोलाच्या भूमिका आपण करतो, तेवढ्याच वजनदार भूमिका मिळणार असतील, तरच हॉलीवूडमध्ये जाऊ असा निर्णय या दोघांनी घेतला.
इरफान खान, अमरीश पुरी, नसरुद्दीन शाह अशा अनेक कलावंतांनी परदेशी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची ताकद दाखविली आहे. शाहरूख किंवा अमिताभ यांच्याप्रमाणे या कलावंतांनी हॉलीवूडकडे अटी आणि शर्ती ठेवल्या नाहीत. वास्तविक शाहरूख खानला भूमिका देण्यात हॉलीवूडच्या निर्मात्यांनी रस दाखविलाही होता. परंतु भारतात ज्या उंचीवर आज शाहरूख आहे, त्याला साजेशा भूमिका हॉलीवूड जोपर्यंत देत नाही,
तोपर्यंत हॉलीवूडकडे ढुंकून पाहायचे नाही असे शाहरूखने ठरविले आहे. हॉलीवूडच्या एकेका चित्रपटाचे बजेट, त्यांच्या चित्रपटांमधील तंत्रज्ञान, चपखल शूटिंग शेड्यूल आणि अन्य झगमगाट यामुळे डोळे दिपले नाहीत, असे होणे शक्य नाही. या साऱ्याच्या प्रेमात भारतीय कलावंतांनी पडणे स्वाभाविक आहे. ही ओढ त्यांना हॉलीवूडकडे घेऊन जाते.
एवढेच नव्हे तर हॉलीवूडचा सिनेमा आपल्यापेक्षा किती पुढे आहे, हे सार्वजनिकरीत्या सांगण्याचा मोहही त्यांना होणे स्वाभाविक आहे. परंतु त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका मात्र किरकोळ स्वरूपाच्याच असल्यामुळे आपला आवडता कलावंत हॉलीवूडच्या चित्रपटात काम करतो, हे पाहून चाहत्यांना होणारा आनंद अल्पजीवी ठरतो.
“मर्डर’ चित्रपटानंतर मल्लिका शेरावतची लोकप्रियता बॉलीवूडमध्ये शिखरावर पोहोचली होती. तिने आपल्या “बोल्ड’ अदांनी रसिकांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले. त्यानंतर मल्लिकाला लगेचच “द मिथ’ हा चित्रपट मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण या चित्रपटात मल्लिका थेट जॅकी चेनसोबत दिसणार होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांसोबत मल्लिकाची छायाचित्रे वर्तमानपत्रांत आणि फिल्मी नियतकालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होऊ लागली होती.
तिने तिची छवी आणखी “बोल्ड’ बनविली. चित्रपटांमधील “मसाला नायिका’ असा शिक्का जिच्यावर होता, ती आंतरराष्ट्रीय स्टार बनणार ही तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच होती. परंतु तिने बनविलेली तिची आंतरराष्ट्रीय प्रतिमासुद्धा स्वयंघोषितच ठरली. “द मिथ’ चित्रपट रिलीज झाला तेव्हा लोकांच्या लक्षात आले, की मल्लिका मोजून साडेसात मिनिटे पडद्यावर दिसते. वास्तविक “मर्डर’नंतर बॉलीवूडमध्ये रसिकांच्या गळ्यातील ताईत बनण्याची संधी तिला मिळाली होती.
परंतु हॉलीवूडच्या आकर्षणामुळे आणि अवघ्या साडेसात मिनिटांच्या या भूमिकेमुळे तीही चेष्टेचा विषय ठरली. एक तर “द मिथ’चे कथानकच भरकटले होते. स्पेशल इफेक्ट्स हास्यास्पद होते. त्यामुळे चित्रपटावरच इतके विनोद झाले, तर त्यातील छोट्याशा भूमिकेद्वारे स्वतःला आंतरराष्ट्रीय कलावंत मानू लागलेल्या मल्लिकाची या हास्यविनोदांमधून सुटका होणे शक्यच नव्हते.
हॉलीवूडमधील कामाची शैली बॉलीवूडपेक्षा खूपच चांगली आहे, यात वाद असण्याचे कारण नाही. हॉलीवूडपटांचे अर्थकारण तर बॉलीवूडच्या तुलनेत कितीतरी मोठे आहे. शिवाय तंत्रज्ञानाची जोड देऊन या चित्रपटांमधून असे काही स्पेशल इफेक्ट्स दिले जातात, की प्रेक्षकांचे डोळे दिपून जातात.