कोल्हापूर – कोल्हापुरात इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापुरातील जनसंघर्ष सेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आता गोवऱ्या आणि मातीच्या चुली भेट दिल्या आहेत. शनिवार पेठ पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे या गोवऱ्या आणि चुली सुपूर्द करण्यात आल्या.
आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसचे दर स्थिर असताना केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही फसवणूक असून लॉकडाऊन, कोविड निर्बंधांमुळे जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सरकारने केलेल्या गॅस, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
सणासुदीच्या तोंडावर महागाईला फोडणी दिल्याने आठ महिन्यात तब्बल 28 टक्के दरवाढ झालेली आहे, असे इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करताना जनसंघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी म्हटले आहे.
उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन मोफत दिल्याची जाहिरात करणाऱ्या केंद्र सरकारने येत्या काही दिवसात ही अन्यायी दरवाढ रद्द न केल्यास पेट्रोल पंपावरील फलक फाडण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.