मुंबई – कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
सध्या निर्बंध वाढविण्याबाबत कोणताही विचार नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. परिस्थिती पाहून मुख्यमंत्री नागपूरच्याबाबतीत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
ऑक्सिजनच्याबाबतीत गेल्या वेळी 1300 मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती, आता 1400 ते 1500 मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे.तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करताना खूप मोठा आकडा सांगितला आहे. ज्यादिवशी 700 मेट्रिक टनच्या वर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरू करू अशा प्रकारची अधिसूचना आरोग्य विभागाने काढली आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात 31 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे. आज राज्यातील 4 ते 5 जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्णसंख्या आहे, त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल तरच तिसरी लाट रोखता येईल असेही आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
एका दिवसात 12 लाखांपेक्षा अधिक लसीकरण
एका दिवसात 12 लाखांच्या वर लसीकरण करून आपण आपली क्षमता सिद्ध केली आहे, लस अजून उपलब्ध झाली तर 12 ते 14 लाख लसीकरण रोज करता येईल. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितता देता येऊ शकेल आणि पर्यायाने तिसऱ्या लाटेची दाहकता कमी होईल. आगामी गणेशोत्सवात शासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे, त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचे पालन करावे, असेही टोपे म्हणाले.