हडपसर – उत्तराखंड राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनने सहा दिवसीय 49 वी पुरुष आणि 41 वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय सुसज्ज पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप काशीपूर येथे आयोजित केली होती. यामध्ये हडपसर येथील स्पेशल चाइल्ड असलेल्या चिंतामणी बाळासाहेब राऊत यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे.
या स्पर्धेत उत्तराखंड व्यतिरिक्त मणिपूर, बंगाल, आसाम, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, अंदमान निकोबार आदी राज्यांतील सुमारे 400 खेळाडू सहभागी झाले होते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पावर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकाविलेले बाकीराज हे चिंतामणी चे प्रशिक्षक आहेत. स्पेशल चाइल्ड असलेल्या चिंतामणी ला व्यायामाची आवड असल्याचे पालक बाळासाहेब राऊत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर विशेष मेहनत घेत त्याला पॉवर लिफ्टिंग शिकवण्याचे ठरवले.
दोन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर चिंतामणीने कोल्हापूर येथील स्पर्धेत सहभाग घेताना मात्र त्यावेळी त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतरही पालक बाळासाहेब राऊत यांनी आणखीन परिश्रम घेऊन पॉंडिचेरी येथील बाकीराज या प्रशिक्षकांची निवड करून चिंतामणी ला स्पर्धेसाठी तयार केले.
नुकत्याच काशीपूर येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत चिंतामणीने सुवर्णपदक जिंकून आपली चुणूक दाखवली आहे. स्पेशल चाईल्ड असलेल्या चिंतामणीसाठी व त्याच्या खेळातील करिअरसाठी हवी तेवढी मेहनत घेण्याची आपली तयारी असून भविष्यात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भारतासाठी चिंतामणी सुवर्णपदकावर आपले नाव कोरेल, असा विश्वास पालक बाळासाहेब राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.