तैपेई, (तैवान) – चीनने गेल्या 24 तासात 71 लढाऊ विमाने आणि 7 युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना केल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. अमेरिकेने आपल्या संरक्षण खर्चाच्या विधेयकामध्ये तैवानशी संबंधित तरतूदी केल्यामुळे संतप्त झालेल्या चीनने ही युद्धसामुग्री तैवानच्या दिशेने रवाना केली आहे. तैवानवरील आपला हक्क दाखवून देण्यासाटीची चीनची धडपड गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. कमुनिस्ट पार्टीच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून तैवानच्या हद्दीमध्ये जवळपास दररोजच लढाऊ विमाने आणि युद्धनौका पाठवल्या जात असतात.
रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत चीनच्या 47 लढाऊ विमानांनी चीन आणि तैवानदरम्यानची अधिकृत सीमा म्हणून ओळखली जाणारी तैवानची खाडी ओलांडली होती, असे तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या विमानांमध्ये 18 जे-16, 6 सुखोई-30 लढाऊ विमाने ड्रोन देखील होती, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. चीनच्या या हालचालींवर तैवानकडून बारीक लक्ष ठेवले जाते आहे आणि जमिनीवरील क्षेपणास्त्रेही सज्ज ठेवली आहेत. तसेच आपल्या युद्धनौकाही सज्ज ठेवल्या आहेत.
अमेरिका आणि तैवानच्या चिथावणीखोर कृतीला हे प्रत्युत्तर आहे, असे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ईस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे नाराज झालेल्या चीनने अशीच लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत तैनात केली होती.