बीजिंग – चीनमध्ये “झिरो-कोविड’धोरण गेल्या 20 दिवसांपूर्वी सौम्य केल्यापासून तब्बल 25 कोटी जणांना करोनाचा ससंसर्ग झाला असल्याचा अंदाज आहे. उघड झालेल्या सरकारी आकडेवारीच्या आधारे “फ्री एशिया’ने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये 1 डिसेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत 248 दशलक्ष जणांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे चीनमधील “नॅशनल हेल्थ कमिशन’च्या एका बैठकीत सांगण्यात आले होते.
ही आकडेवारी 20 डिसेंबरची आहे. मात्र प्रत्यक्ष्यात ही संख्या 37 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. उपलब्ध झालेले सरकारी आकडे खरे असून या बैठकीला उपलब्ध असलेल्यांनीच जनहिताचा विचार करून ती उघड केली असल्याचे चीनमधील वरिष्ठ पत्रकारांनी म्हटले आहे.
दरम्यान चीनमध्ये नव्याने 3,761 जणांना करोनाची लागण झाली असून कोणाचाही करोनामुळे मृत्यू झालेला नाही, असे चीनने म्हटले आहे. मात्र चीनमध्ये दररोज 10 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना करोनाचा संसर्ग आणि दररोज किमान 5 हजारजणांचा मृत्यू होत असल्याचे ब्रिटनमधील “एअरफिनिटी’ या आरोग्य डेटा कंपनीने म्हटले होते.
“एअरफिनिटी’ने चीनमधील प्रांताच्या निरीक्षणांच्या आधारे ही आकडेवारी दिली आहे. बीजिंग आणि गुआंगदोंगमध्ये हे आकडे वाढत आहेत. याचनुसार चीनमधील अन्य प्रांतामध्येही अशीच वाढ दिसेल. जानेवारी चीनमधील दैनंदिन रुग्णांची संख्या 3.7 दशलक्ष आणि मार्चमध्ये 4.2 दशलक्ष इतकी वाढू शकते, असेही “एअरफिनिटी’ने म्हटले आहे.
चीनमध्ये सामुदायिक चाचण्या थांबवल्या गेल्या आहेत. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांचीही नोंद नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष संसर्ग झालेल्यांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये करोना संसर्ग झाल्यानंतर श्वसनाशी संबंधित आजार किंवा न्युमोनियामुळे मृत्यू होणाऱ्यांचीच नोंद होत असते. मात्र अन्य देशांमध्ये करोनाच्या संसर्गानंतर होणाऱ्या मृत्यूची नोंद “करोना रुग्ण’ म्हणूनच केली जात असते. यामुळेच चीनमधील करोना मृत्यूचा आकडा कमी असतो, असेही या अहवालात म्हटले आहे.