नवी दिल्ली – इराण आणि चीन दरम्यान 400 अब्ज डॉलरचा संरक्षण करार झाला आहे. इराणमधील चाबहार बंदरापासून ते झहेदान दरम्यानच्या 628 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या
आराखड्याचे उद्घाटन इराणचे परिवहन आणि शहरी विकास मंत्री मोहंम्मद इस्लामी यांनी गेल्याच आठवड्यात केले आहे.
हा मार्ग अफगाणिस्तानच्या सीमेजवळच्या झेरांग जवळून जाणार आहे. या मार्गामुळे चाबहार बंदराला इराणमधील दक्षिण पूर्वेकडील सिस्तन बलुचिस्तान प्रांताची राजधानी झहेदानला जोडले जाणार आहे. या मार्गाचे काम इराणच्या दिनदर्शिकेनुसार 1400 साली म्हणजे मार्च 2022 साली पूर्ण होणार आहे. या 628 किलोमीटरच्या रेल्वेमार्गापैकी 150 किलोमीटरचा मार्ग हा याच वर्षभरात म्हणजे मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
चाबहार झहेदान या संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या मार्गामुळे चाबहार बंदर हे देशाच्या व्यापारासाठीचे प्रवेशद्वार म्हणून विकसित व्हायला मदत होणार आहे. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक विकास साधण्यासाठी या भागातील पायाभूत सुविधांचा विकास होणेही गरजेचे आहे, असे तेहरानमधून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.
चाबहार बंदर हे इराणमधील एकमेव सागरी बंदर असल्याने आणि विदेशांशी या बंदराद्वारे सागरी मार्गांने इराणला जोडलेले असल्याने चाबहारला देशातील रेल्वेच्या नेटवर्कशी जोडणे महत्वाचे होते. यामुळे मरकन किनारपट्टीचा परिवहनासाठी विकास होणार आहे.
मध्य आशिया आणि अफगाणिस्तानशी खुल्या सागरी मार्गांनी जोडले जाता येणार आहे. त्यामुळे पर्यायाने इंधनाची बचत होणार आहे आणि रस्त्यांच्या मार्गांवर होणारे संभाव्य अपघात टाळताही येणार आहेत. त्यामुळे स्थायी विकासाला चालन मिळेल. याशिवाय सागरीमार्गांनी व्यापारवृद्धीला चालनाही मिळेल, असेही इराणने प्रसिद्धीस दिलेल्य निवेदनात म्हटले आहे.
या नवीन मार्गावरून मार्च 2022 पासून 9 लाख 27 हजार प्रवासी आणि 28 लाख टन मालवाहतुक सुरू होणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट मानले गेले आहे. चाबहार बंदर भारताने विकसित करून दिलेले असताना या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी चीनला प्राधान्य देण्यात आल्यामुळे इराण आणि चीनमधील संबंध अधिक जवळचे झाल्याचे दिसते आहे.