पुणे – वाढत्या हृदय विकारांमागे हवेतील प्रदूषण हे देखील एक कारण असल्याचे प्रकाशात आले आहे, असे “कार्डियाक इमेजिंग वर्ल्ड कॉंग्रेस’चे अध्यक्ष आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सी. आर. मंजुनाथ यांनी सांगितले. “कार्डियाक इमेजिंग आणि क्लिनिकल कार्डिओलॉजी’ या विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मंजुनाथ यांचे भाषण झाले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला, “वर्ल्ड फेडरेशन ऑफ कार्डियाक इमेजिंग अँड क्लिनिकल कार्डिओलॉजी’चे अध्यक्ष डॉ. जी. एन. महापात्रा, इंदूरच्या “श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चे संस्थापक डॉ. विनोद भंडारी आदी उपस्थित होते.
जीवनशैली आजारांच्या बाबतीत भारतात गंभीर परिस्थिती असून, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आणि अलीकडच्या काळात स्क्रीन ऍडिक्शन वाढत आहे. हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक- तृतीयांश चाळीशीच्या आतील व्यक्तींचे होत असल्याची चिंताजनक परिस्थिती डॉ. मंजुनाथ यांनी सांगितली. पूर्वी शहरातील आणि विशेषतः संपन्न लोकांना होणारे हृदयविकार आज गरीब, कामगार आणि गावकऱ्यांना देखील होत आहे. लहान मुलांची झोप नीट व्हावी आणि मुलांची तयारी करताना पालकांचा देखील ताणतणाव कमी व्हावा, यासाठी मुलांच्या शाळा साडेदहा वाजेपासून सुरू करणे चांगले होईल, असेही डॉ. मंजुनाथ म्हणाले.
” कार्डियाक इमेजिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान आणि उपचारामध्ये क्रांतिकारी बदल झाले आहेत. लाखो लोकांना त्यामुळे जीवनदान मिळत आहे तसेच रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारत आहे. मात्र वयाच्या 20-30 व्या वर्षीच युवकांमध्ये दिसून येणारे हृदयविकार ही चिंतेची बाब असून, ते थांबवण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी समाजाला मार्गदर्शन करावे. हृदयरोग आणि त्यासाठी लागणारा रोगनिदान खर्च “आयुष्मान भारत’सारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल.” – रमेश बैस, राज्यपाल