श्रीगोंदा – तालुक्यातील वांगदरी हद्दीतील ढोकराई फाटा येथील प्राथमिक शाळेची वर्गखोली पडल्याने एक वर्ग गेल्या तीन महिन्यांपासून चक्क उघड्यावर पिंपळाच्या झाडाखाली भरविला जात आहे. प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत असून बसायला जागाच नसल्याने या चिमुकल्यांचे हाल होत आहेत.
ढोकराई फाटा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत आसपासच्या गावांतील 141 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेला चार वर्गखोल्या आहेत. परंतु, 2018 मध्ये एका वर्गखोलीचा काही भाग पडला. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून गेल्या चार वर्षांपासून एक वर्ग शेजारीच असलेल्या मंदिरात भरविला जात होता. तेव्हाही या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु, नोव्हेंबर 2022 मध्ये स्थानिकांमधील जागेच्या वादातून या मंदिराला देखील कुलूप लावण्यात आले. आधी उपलब्ध असलेला एक वर्ग मंदिरात भरविण्याचा पर्यायही यामुळे संपुष्टात आला. त्यामुळे 12 नोव्हेंबर 2022 पासून येथील एक वर्ग उघड्यावर पिंपळाच्या झाडाखाली भरविला जात आहे.
उघड्यावर शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या या चिमुकल्यांना सध्या सकाळी थंडी आणि दुपारी ऊन अशा दोन्ही गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. तर कधी जीव मुठीत धरून पडक्या खोलीच्या पडवीत बसावे लागत आहे. स्थानिक आणि प्रशासनाच्या कात्रीत चिमुकल्यांना हाल सोसावे लागत आहेत.
दोनदा निधी गेला माघारी
ढोकराई फाटा येथील शाळेसाठी जिल्हा नियोजन आणि साई संस्थांनच्या माध्यमातून प्रत्येकी दोन खोल्या मंजूर करण्यात आल्या होत्या. परंतु, शाळेच्या जागेवरून वाद सुरू असल्याने हा निधी दोनदा माघारी गेल्याची माहिती प्रशासनाने दिली.