‘त्या’वर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरीही झाली – राहुल कुल

दौंड – दौंड तालुक्‍यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालयाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता, या मागणीला यश आले असून, दौंडसाठी सरकारने स्वतंत्र प्रांत कार्यालय मंजूर केले आहे, यावर मुख्यमंत्र्याची स्वाक्षरीही झाली आहे, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

दौंड तालुक्‍यातील प्रलंबित प्रश्‍नांबाबत आमदार कुल बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रांत कार्यालय दौंडला आणण्यावरून मोठा राजकीय खल झाला आहे. त्यानंतरही हे कार्यालय पुरंदरला गेल्याने या चुकीच्या निर्णयाचा फटका दौंडकरांना बसत आहे. यामुळे दौंडकरिता स्वतंत्र प्रांत कार्यालय असावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती.

याबाबत शासनाकडे पाठपुरावा कायम होता. याला आता यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दौंडकरिता स्वतंत्र प्रांतकार्यालय मंजूर झाले असून, यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. आता, फक्‍त पदनिर्मिती व कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया बाकी आहे. तेही काम आगामी काळात लवकरच होईल, असेही आमदार कुल यांनी सांगितले.

रुग्णांची गैरसोय थांबणार…
दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे सध्या 50 खाटांचे आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याच करणातून येथे अधिक खाटांचे रुग्णालयाची मागणी करण्यात आली होती. ही मागणीही मान्य करण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांचे होणार आहे. यासाठीचा निधी मंजूर असून लवकरच पदनिर्मिती व इतर सुविधेसह, इमारतीचे कामही सुरू होणार आहे.

यामुळे ठेकेदाराला दंड…
अष्टविनायक रस्त्याच्या कामाला मोठा उशीर झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच कारणातून संबंधित ठेकेदाराची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आली. यामुळे त्या ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आला असून नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातून हे काम लवकर मार्गी लागेल, असे आमदार कुल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.