कात्रज – कात्रज येथील राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील प्रमुख आकर्षण असलेला “तेजस’ नावाच्या आशियाई सिंहाचा शुक्रवारी दुपारी पक्षाघाताने मृत्यू झाला. याचे वय नऊ वर्षे इतके होते. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंहांची एक जोडी होती. त्यामध्ये एक मादी आणि हा एक नर होता.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तेजस हा आशियाई सिंह सहा वर्षे वय असताना गुजरात येथून आणला होता. याच्या शरीराच्या पार्श्वभागाचा पक्षाघात 17 जुलै रोजी झाला होता. तेव्हापासूनच त्याच्या शरीराची संपूर्ण हालचाल पूर्ण बंद झाली होती. भूक मंदावल्याने व आहार कमी होत जावून, शेवटी पूर्ण खाणे बंद केले होते. केवळ शिरेतून सलाईन देऊन त्याद्वारे मल्टी विटामिन्स, व इतर औषधांद्वारे त्याला ताकद देण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र, या औषधांना त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर शुक्रवारी “तेजस’ याचा मृत्यू झाला.
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर दिग्रसकर, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. ना. तू. दक्षिणकर, प्राणिसंग्रहालयाच्या प्राणी आरोग्य सल्लागार समितीचे सदस्य शल्यचिकित्सक डॉ. फिरोज खंबाटा, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद मेश्राम, पशुरोग निदान व विकृतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर मोटे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत म्हसे, इत्यादी पशुवैद्यक चिकित्सकांनी तेजस सिंहावर नैदानिक चाचण्या करून उपचार केले. तथापि उपचारास तेजस या सिंहाने प्रतिसाद दिला नाही. तब्बल 24 दिवस तेजस सिंहावर सलाईनद्वारे जीवनावश्यक औषधे दिली जात होती. पण त्याचा मृत्यू झाला. मृत तेजस सिंहाचे शवविच्छेदन क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ चंद्रशेखर मोटे यांनी केले. “तेजस’च्या मृत्यूने राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहे.