वाघळवाडी जिल्हा परिषद शाळेतील शौचालय कामात अपहार

सोमेश्‍वरनगर/वाघळवाडी – वाघळवाडी ग्रामपंचायत (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद शाळेतील शौचालय कामात 99 हजार 700 रूपये रकमेचा अपहार झाला असून बारामती गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही बाब उघड झाली आहे.

वाघळवाडी ग्रामपंचायत शाळेच्या शौचालय कामाची चौकशी व्हावी याकरिताचा अर्ज उपसरपंच जितेंद्र सुकुंडे आणि सात ग्रामपंचायत सदस्यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे दि. 31 डिसेंबर 2018 रोजी केला होता. यानुसार सहायक गटविकास अधिकारी एम. बी. मोरे यांनी केलेल्या चौकशीत ही बाब उघडकीस आली आहे.

वाघळवाडी शाळेच्या शौचालयाच्या कामाची चौकशी करून एकूण 99 हजार 700 रुपये भ्रष्टाचार झाल्याचे तसेच याबाबत कारवाई कण्याबाबत विस्तार अधिकारी एम. टी. कारंडे यांनी दि. 21 जानेवारी 2019 रोजी अहवाल सादर केला होता. परंतु, तक्ररादारांना या प्रकरणाचा अहवाल मान्य नसल्यामुळे त्यांनी या भ्रष्टाचाराची प्रकरणांची फेरचौकशी व्हावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली होती.

यानुसार सहाय्यक गटविकास अधिकारी एम. बी. मोरे यांची याकामी नियुक्‍ती केली होती. यानुसार मोरे यांनी गट शिक्षण अधिकारी, बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्याकडून या कामाचे अहवाल मागवून चौकशी केली असता शौचालयाच्या कामात अपहार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.

सोमेश्‍वरनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधकामासाठी निरीक्षण महा निर्धेष्णालाय सीमाशुल्क व जीएसटी. पश्‍चिम क्षेत्र एकक मुबई यांच्याद्वारे 1 लाख 25 हजारांचा निधी शाळा व्यवस्था समितीला मिळाला होता. एस. एस. महानवर या खासगी अभियंत्याकडून कामाचे अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले. हे अंदाजपत्रक 1 लाख 34 हजार 113 रुपये रकमेचे होते. यानुसार ठेकेदारास कामही देण्यात आले. हे काम पूर्ण झाल्याचा दाखला दि. 13 जून 2018 रोजी शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा दि.27 जुलै 2018 रोजी करण्यात आला. त्यानंतर ठेकेदार महानवर यांनी ग्रामपंचायतीला दि. 13 ऑगस्ट 2018 रोजी पत्र देऊन शौचालयासाठी 2 लाख 51 हजार रुपये खर्च झाला आहे. एक लाख 25 हजार रुपये वगळून उर्वरित रक्‍कम देण्याबाबत मागणी केली होती.

ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी कामाचे अंदाजपत्रक आणि मोजमापन मूल्यांकन दिले. ग्रामपंचायतीने 2018-19चे अंदाजपत्रक तपासले असता शौचालयाच्या कामाची तरतूदच केली नाही. याकामी गटविकास अधिकाऱ्यांची मान्यताही घेतली नाही. शिवाय मूळ अंदाजपत्रक 1 लाख 34 हजार रुपये असताना ठेकेदाराला करारनामा न करताच ग्रामपंचायतीने रुपये 99 हजार 700 रुपये अदा केले आहेत. वास्तविक उपअभियंत्यांनी 2 लाख 52 हजार 457 रुपयांचे मोजमाप दिलेले असताना शाळा व्यवस्थापन समितीने फक्‍त 1 लाख 25 हजार रूपये दिले. ठेकेदारास 1 लाख 27 हजार रुपये देय असताना ग्रामपंचायतीने 99 हजार 700 रुपये इतकी रक्‍कम दिली. ही बाब संशयास्पद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने अदा केलेली रक्‍कम संबंधित सरपंच, ग्रामसेवक अधिकाऱ्यांकडून वसुलीस पात्र आहे. ही रक्‍कम तत्काळ संबंधितांकडून वसूल करून ग्रामनिधीमध्ये भरणा करावी, संबंधित ग्रामसेवकांवर शिस्तभंग कारवाई करून अहवाल विनाविलंब कार्यालयास सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.