पुणे -कोणतीही निवडणूक ही भाजपसाठी लहान अथवा मोठी नसते. ती आम्ही निवडणूक म्हणूनच सर्व ताकद लावून लढतो. असे सांगणाऱ्या भाजपने कसबा विधानसभा निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यातच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रचारात सक्रीय सहभाग घेत रॅली, पदयात्रा, वैयक्तिक गाठी-भेटी आणि सभा अशा सर्वच पातळ्यांवर प्रचारात मुसंडी मारल्याने कसबा विधानसभा निवडणुकीत रंगत आली आहे.
गेले दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानात उतरल्याने कसबा जिंकण्यासाठी भाजपने लावलेली ताकद चर्चेचा विषय ठरत असून, भाजपला त्याचा फायदाच होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेरीनंतर प्रचाराच्या सांगतेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांची पूर्व भागात रॅली काढण्यात आली. त्यानंतर लालमहाल येथील निवडणूक कार्यालयात प्रचाराची सांगाता झाली.
या भागात प्रामुख्याने बहुजन समाजाचा मतदार असून, या भागातही मुख्यमंत्री शिंदे यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार प्रवीण दरेकर, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.
शेवटचे दोन दिवस भाजपने कसबा मतदारसंघात राबविलेली रणनीती भाजपला विजयाकडे घेऊन जाणार का हे या निवडणुकीच्या निकालानंतरच ठरणार आहे.
कसबा भाजपचा बालेकिल्ला असला तरी कोणताही धोका पत्करण्यास तयार नसलेल्या भाजपने हिदूंत्वाचा नारा देत ही निवडणूक आपल्या बाजूला वळविणाचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीची धुरा स्वत: फडणवीस यांनी हातात घेतली. प्रचारात गेल्या काही दिवसांत चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते पुण्यात तळ ठोकून होते. स्वतः फडणवीसांनी या मतदारसंघाला जवळपास एक दिवसाआड वेळ दिला. जाहीर सभा आणि रॅली यांच्यापेक्षा भाजपचा भर हा व्यक्तिगत गाठीभेटी, समाज भेटी आणि विविध वर्गांचे मेळावे यावरच होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुमारे तीन तास विविध गटांच्या भेटी घेतल्या. कसब्यात पाच वेळा आमदार असलेले गिरीश बापट यांनीही प्रकृती ठीक नसताना एका मेळाव्याला उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा पुणे दौराही भाजपच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला. या दौऱ्यात शहा यांनी स्वतः जाऊन बापट यांची भेट घेतली. तसेच शैलेश टिळक, कुणाल टिळक यांचीही भेट घेतली.