पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. याच प्रकारे सायबर चोरट्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) ऑफिसरची ५७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी २८ वर्षीय ऑफिसरने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ मार्च रोजी घडली.
फिर्यादी तरुण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत ऑफिसर आहे. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी संदेश पाठवून त्याला जाळ्यात ओढले. त्याला एका व्हाॅटस् ॲप ग्रुपमध्ये ॲड करून घेतले. तरुणाने सुरुवातीला थोडी रक्कम गुंतविली. त्यानंतर चोरट्यांनी त्याला परताव्यापोटी अडीच लाख रुपये दिले.
त्यामुळे तरुणाचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्याला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. तरुणाने वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यात ५७ लाख २२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा करण्यात आल्यानंतर मात्र परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.
शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर परतावा देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादी हे एनडीएत ऑफिसर आहेत. वाय.एन. शेख (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उत्तमनगर)