रंजना गगे यांची महिनाभरात बदली
सातारा (प्रतिनिधी) : सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजीत बापट यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी वर्णी लागली आहे . अवघ्या महिनाभरात मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या बदलीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे .
मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीनंतर २ जुलै रोजी रंजना गगे सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा भार सांभाळला होता. लक्ष्मी टेकडी परिसरात कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी केलेल्या अँटी जेन टेस्ट कामाची चांगलीच चर्चा झाली. त्यामुळे तेथील करोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले. कामचुकार अधिकाऱ्यांना शिस्तीचा चाप लावण्यात त्यांनी कसूर केली नाही . प्रशासकीय कारभाराचे गाडे सुरळीत करत असताना रंजना गगे यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून अभिजीत बापट यांची प्रशासकीय बदली झाल्याचे नगरविकास विभागाकडून लेखी पत्र मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले.
2012 ते 16 या चार वर्षात बापट यांनी आधी साताऱ्यात नगर प्रशासन अधिकारी म्हणून आणि त्यानंतर तीन वर्ष म्हणून सातारा पालिका मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली होती. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी उत्तम समन्वय असणारे मुख्याधिकारी म्हणून अभिजीत बापट यांची ओळख आहे . मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या प्रशासकीय सेवेचे २२ महिने शिल्लक होते. त्यांनी सुद्धा पुणे विभागात बदली मिळावी यासाठी विनंती अर्ज नगर विकास विभागाकडे केला होता .मात्र, राजकीय संपर्कातील मुख्याधिकारी साताऱ्यात आणण्यासाठी सत्ताधारी सातारा विकास आघाडीकडून मोठी मोर्चेबांधणी मंत्रालयात झाली होती.