सातारा -सातारा नगरपालिकेने गणेश मंडळांना गुगल फॉर्म उपलब्ध करून दिले असून परवान्यासाठी लिंक शेअर केली जाणार आहे. मात्र, त्याकरिता गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील परवानगी आणणे गरजेचे आहे. सातारा पालिकेने टाकलेले हायटेक पाऊल चर्चेचा विषय झाला आहे.
गणेश मंडळांच्या यादीत सुसूत्रता आणण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकीतील संभाव्य वाद टाळण्यासाठी सातारा पालिकेने शहरातील 153 पेक्षा अधिक मंडळांची ऑनलाइन नोंदणी आतापासूनच सुरू केली आहे. त्याकरता गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला असून त्याची लिंक जाहीर करण्यात आली आहे यामध्ये मंडळाचे नाव, सभासद संख्या, नोंदणी क्रमांक, विसर्जन मिरवणुकीचा क्रमांक, अध्यक्षांचे नाव, सादर होणाऱ्या देखाव्याचे नाव असे विविध तपशील संबंधित मंडळाच्या सदस्यांनी भरावयाचे आहेत.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पालिकेने गेल्या दोन वर्षापासून ही हायटेक पद्धत सुरू केली आहे. पालिकेच्या शहर विकास विभागात अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्याकडे गणेश मंडळांना ही नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. साताऱ्यात 122 हून अधिक गणेश मंडळे असून शहराची हद्दवाढ झाल्यामुळे नवीन भागातील तीसपेक्षा अधिक मंडळाची भर नव्याने झाली आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवरही जादा ताण पडणार आहे.
तलावांची स्वच्छता सुरु
शहरातील मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बुधवार नाका येथील कृत्रिम तलाव, हुतात्मा उद्यान, दगडी शाळा आणि राजवाडा परिसरातील भवानी तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तळ्यांसह विविध ठिकाणी छोट्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी 20 हौद आणि छोट्या तळ्यांची निर्मिती केली जाणार आहे. शाहूपुरी, विलासपूर इत्यादी भागात सात छोटी तळी उभारली जाणार असल्याचे बांधकाम अभियंता दिलीप चिद्रे यांनी सांगितले.
====================