नवी दिल्ली – युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने गुरुवारी नव्या मोसमाच्या कार्यक्रमात फेरबदल केला. पुढील महिन्यात मॅटिओ पेलिकॉन येथे होणारी स्पर्धा पुढे ढकलली असून, आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेच्या यजमानपदासाठी अल्मटी आणि ट्युनिस या दोन नव्या यजमान शहरांची निवड केली.
ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे इटली कुस्ती महासंघाला हा निर्णय घ्यावा लागला. ही स्पर्धा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ४ ते ७ फेब्रुवारी रोजी रोममध्ये मॅटिओ पेलिकॉन येथे होणार होती. आता ही स्पर्धा तिसऱ्या टप्प्यात २२ ते २५ जून दरम्यान होईल. त्यापूर्वी इटलीत पाला पेलिकॉन येथे २० वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
युडब्ल्यूडब्ल्यूच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत मानांकन स्पर्धेचा अंतिम कार्यक्रमही निश्चित करण्यात आला. मानांकन मालिकेतील उर्वरित स्पर्धांच्या आयोजनासाठी आफ्रिका आणि आशिया खंडांची निवड करण्यात आली आहे.
अशा होतील मानांकन मालिका स्पर्धा
पहिली स्पर्धा २४ ते २७ फेब्रुवारी, इस्तंबूल (तुर्की)
दुसरी स्पर्धा २ ते ५ जून, अल्मटी (कझाकस्तान)
तिसरी स्पर्धा २२ ते २५ जून, रोम (इटली)
चौथी स्पर्धा १४ ते १७ जुलै, ट्युनिस (ट्युनिशिया)
सलग दोन वर्षे लोवा येथे जागतिक स्पर्धा
सलग दोन जागतिक स्पर्धेचे आयोजन अमेरिकेतील लोवा शहराला देण्यात आले आहे. येथे २०२२ आणि २०२३ मधील पुरुष आणि महिला फ्री-स्टाईल विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन होईल. या शहराला दुसऱ्यांदा जागतिक स्पर्धा आयोजनाची संधी मिळाली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये प्रथम येथे जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.