नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अहवालात बदल करण्यास सांगितले होते, असा दावा अँटिलिया बॉम्ब प्रकरणी मुंबई पोलिसांसोबत काम केलेल्या एका सायबर तज्ज्ञाने केला आहे. या प्रकरणात जैश-उल-हिंदचे पोस्टर जोडणे आवश्यक असल्याचे म्हणत सिंग यांनी या कामासाठी 5 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते, असेही या तज्ज्ञाने म्हटले आहे.
अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूच्या प्रकरणांमध्ये एनआयएच्या आरोपपत्रात या सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला. या तज्ज्ञाने 25 फेब्रुवारी रोजी या घटनेची चौकशी करून मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला होता.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या आढळल्या होत्या. या कृत्याची जबाबदारी जैश-उल-हिंद नावाच्या एका संघटनेने टेलिग्राम चॅनेलवर स्वीकारली होती.
मार्च 2021 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएला सोपवण्यात आला होता. एनआयएच्या तपासादरम्यान, एका सायबर तज्ज्ञाने सांगितले की, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात 9 मार्च रोजी त्याने मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली होती.
यावेळी आपण या वर्षी जानेवारीमध्ये इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला मदत केली होती, असे सिंग यांना सांगितले होते. तसेच जैश-उल-हिंदने तिहाड जेलमधील एका फोन नंबरबर टेलिग्रामवर या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, असे सांगितले. यावेळी परमबीर सिंह यांनी त्याला अँटिलिया प्रकरणात असाच अहवाल देण्यास सांगितले होते, असा दावा या सायबर तज्ज्ञाने केला आहे.
मी लेखी स्वरुपात असा अहवाल देऊ शकतो का, असे सिंग यांनी मला विचारले. मी म्हटले की, हे काम गोपनीय आहे आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून केले जात आहे. त्यामुळे कोणताही अहवाल देणे योग्य नाही. पण सिंग म्हणाले की, ही एक अतिशय महत्वाची बाब असून मी तो अहवाल द्यावा. तसेच ते एनआयएच्या आयजीशी या संदर्भात बोलणार होते, असेही या तज्ज्ञाने सांगितले.