‘चंद्रकांत पाटलांनी स्वार्थासाठी मेधा कुलकर्णींचा बळी दिला’

जळगाव – विधानपरिषदेच्या तिकिटावरून भाजपमध्ये चांगलेच अंतर्गत राजकारण पेटले आहे. भाजप नेते एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु झाले आहे. यातच चंद्रकांत पाटील यांनी स्वार्थासाठी मेधा कुलकर्णी यांचा बळी दिला, असा आरोप खडसेंनी केला आहे.

विधान परिषदेचे तिकीट नाकारल्याने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, मेधा कुलकर्णी हे भाजपचे मोठे नेते पक्षावर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे एकामागून एक राजकीय टीकेचे बाण सोडून भाजपला घरचा आहेर देत आहेत. खडसे म्हणाले कि, चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी परिषदेचं इतकं काम केले आहे, तर त्यांनी मेधा कुलकर्णीचे आमदारकीचे तिकीट कापून स्वतः उभं राहायला नको होतं. त्यांनी स्वार्थासाठी मेधा कुलकर्णींचा बळी दिला. तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, तर तुम्ही कुठूनही निवडून यायला हवे. त्यांनी कोल्हापूरमधून निवडणूक का लढवली नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.

तसेच  चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना पक्षानं भरपूर दिलं आहे. खडसे यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, असे एका मुलाखतीदरम्यान म्हंटले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना एकनाथ  म्हणाले कि, मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो आणि यापुढेही कायम राहिल. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचा पक्षाशी संबंध आला. मात्र, १९८० मध्ये जेव्हा भाजपाचा साधा सरपंचही नव्हता, तेव्हा भाजपातून मी पंचायत समितीचा सदस्य होतो. भाजपाचा माणूस उभा राहिला की, तो हरणार हे निश्चित असायचं, अशा काळापासून मी काम केलं. त्यामुळे आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.