मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमच्याकडे जास्त खासदार, आमदार असल्याचे सांगत आम्हीच खरी शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आम्हाला मिळावे, असा दावा केला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. त्यानंतर न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे गेले. त्यावर निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री महत्वाचा निर्णय देत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं गोठवले.
तसेच शिवसेना हे नाव आणि चिन्हं दोन्हीही गटाला वापरता येणार नसल्याचे सांगितले. हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत नवीन पक्ष आणि पक्षचिन्हासाठी नाव सुचविण्यास सांगितले. अंधेरी पोटनिवडणूकीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नावे सादर करण्यात आली आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावे पर्याय म्हणून आयोगाकडे देण्यात आली आहेत. यातील पहिले नाव म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही देण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावे सादर करण्यात आली आहेत.
दोन्ही गटांनी चिन्हांसाठीही नावे सुचवली आहेत. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय ठाकरे गटाकडून दिला आहे. तर शिंदे गटाकडून उगवता सूर्य , त्रिशुळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला आहे.
दरम्यान, ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून निवडणूक चिन्हांसाठी देण्यात आलेली दोन नावे सारखीच आहेत. मात्र एक नाव वेगवेगळे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धगधगती मशाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गदा हे निवडणूक चिन्हं मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक जवळ आली आहे आणि नवीन चिन्हं घराघरात पोहोचविण्यासाठी दोन्ही गटांना वेळ मिळावा यासाठी याबाबतचा निर्णय आजच होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.