पुणे :- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृतमहोत्सवी (75 वर्षे) स्थापना वर्षानिमित्त आयोजित एनडीए ओपन स्क्वॅश स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या चैतन्य शहा याने, तर महिला गटात जनीत विधी यांनी विजेतेपद संपादन केले.
स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया (एसआरएफआय) यांच्या मान्यतेखाली नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला येथील इंडोर स्पोर्टस कॉम्प्लेक्स, स्क्वॅश कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या चैतन्य शहा याने सर्व्हिसेसच्या वैभव चौहानचा 11-08, 11-08, 13-11 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
महिला गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या जनीत विधी हिने तेलंगणाच्या आर्या द्विवेदीचा 11-05, 11-02, 11-04 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, एव्हीएसएम, एनएम, कमांडंट, एनडीए यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सह सचिव डॉ. दयानंद कुमार, महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांडरे आदी उपस्थित होते.