नवी दिल्ली – किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्युचर समूहाने दिल्ली उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्युचर रिटेलची खरेदी केली आहे. या व्यवहाराला जेफ बेझॉस यांच्या नेतृत्वाखालील ऍमेझॉन कंपनीने न्यायालयात आव्हान दिले तर आमची बाजू ऐकून घ्यावी असे फ्युचर रिटेलने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय लवादात ऍमेझॉन कंपनीने स्वतःच्या बाजूकडून निर्णय मिळविण्यात यश मिळविले आहे. फ्युचर समूहाने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या कॅव्हेटसंदर्भातील माहिती ऍमेझॉनला कळविले आहे. लवादाने मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कंपनी व फ्युचर कंपनीच्या व्यवहाराला दिलेली स्थगिती कायदेशीररित्या आमच्यावर बंधनकारक नाही अशी भूमिका फ्युचर रिटेलने घेतली असून हा व्यवहार पूर्ण होऊ द्यावा अशी विनंती शेअरबाजारांना केली आहे. भारतातील बलाढ्य रिटेल क्षेत्र काबीज करण्यासाठी आत या कंपन्यांतील रस्सीखेच आगामी काळात वाढणार आहे.
अॅमेझॉनचे म्हणणे काय?
अॅमेझॉन कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फ्युचर समूहातील एका कंपनीतील 50 टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यानंतर तीन ते दहा वर्षांच्या काळात फ्युचर समूह विकत घेण्याची शक्यता खुली ठेवली होती. या करारानुसार फ्युचर समूहाने विक्रीबाबत ऍमेझॉनला प्रथम विचारण्याची गरज होती, असे ऍमेझॉनचे म्हणणे आहे. रिलायन्स व फ्युचरदरम्यान व्यवहारामुळे जुन्या व्यवहारावर परिणाम झाला.