मुंबई – मराठीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर हे अनेक कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र, पुन्हा एकदा महेश मांजरेकर चर्चेत आल्याचं दिसून आलं आहे. एका जुन्या भांडणामुळे मांजरेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी म्हणजेच २०२१ ला पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ महेश मांजरेकर आणि टेभुर्णीतील आश्रमशाळेचे संस्थाचालक कैलास सातपुते यांच्यात अपघात झाला होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी कैलास सातपुते यांच्याविषयी बदनामी करणारे वक्तव्य केले होते.
याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याबरोबरच पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मांजरेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकर हे कारने पुणे- सोलापूर महामार्गाने सोलापूरच्या दिशेने जात होते. तर कैलास सातपुते हे सुद्धा आपल्या कारने सोलापूरच्या दिशेने जात होते. दोन्ही मोटारी यवत हद्दीत आल्या असता मांजरेकर यांच्या कारचालकाने अचानक गाडी ब्रेक केली. त्यावेळी सातपुते यांच्या कारची मांजरेकर यांच्या कारला पाठीमागून धडक बसली.
या धडकेत मांजरेकर यांच्या मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. त्यामुळे संतापलेल्या मांजरेकर यांनी कैलास सातपुते यांना शिवीगाळ व धमकी देत मारहाण केली. पोलिसांनी मांजरेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, यावेळी महेश मांजरेकरांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.