पुणे – “पीएमपी’च्या वाहकांना बसेस मार्गावर नेताना वैयक्तिक रक्कम सोबत ठेवण्याची परवानगी नसते. मात्र, अनेक वाहक स्वत:कडे अधिक रक्कम ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रक्कम प्रशासकीय की वैयक्तिक आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर वैयक्तिक रकमेची नोंद टाइमकीपरकडे करणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक जारी केले असून नोंद न करता रक्कम बाळगल्यास कारवाईचा इशारा “पीएमपी’ प्रशासनाने दिला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात बस सेवा पुरविली जात असून 13 डेपोंमध्ये चार हजारांहून अधिक वाहक आहेत. ड्युटी संपल्यानंतर तिकीटाची रक्कम आगारात जमा करण्यात येते. पारदर्शकता राहण्यासाठी वाहकांना वैयक्तिक रक्कम सोबत ठेवण्यास मनाई असते. मात्र, अनेक कर्मचारी अधिकची रक्कम जवळ बाळगत असल्याचे पर्यवेक्षक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आदेश दिले आहेत.
काही अनिवार्य कारणास्तव वाहकांनी रक्कम सोबत ठेवल्यास मार्गावर जाण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्याने रकमेची माहिती देणे बंधनकारक आहे. संबंधित डेपोतील टाइमकिपरकडे पैशांची माहिती देऊन त्याची सही घ्यावी लागणार आहे. नोंद नसल्यास तपासणीत जादा रक्कम आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे.
वाहकांनी वैयक्तिक रक्कम न बाळगण्याबाबतचा नियम अनेक वर्षांपासून आहे. मात्र अनेक वाहक याचे उल्लंघन करत असून, वाहकांकडे तिकीट रकमेव्यतिरिक्त जादा रक्कम आढळत आहे. तिकीटाची रक्कम आणि कर्मचाऱ्यांकडील रक्कम यात तफावत आढळत आहे. या प्रकारांना आळा बसण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी