कार्ला – एकवीरा देवी मंदिर परिसरात असणाऱ्या कार्ला लेणी डोंगरावरुन मंगळवारी (दि. 21) मोठे दगड कोसळले. घटनेनंतर आज, बुधवारी (22) मावळचे तहसीलदार मधुसूधन बर्गे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. जोपर्यंत पावसाचा जोर कमी होत नाही, तोपर्यंत पुरातत्व विभागाने कार्ला लेणी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले.
कार्ला-वेहरगाव परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कार्ला लेणीवरील डोंगरावरुन मोठे दगड कोसळले. यावेळी पर्यटक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. बुधवारी तहसीलदार मधुसूधन बर्गे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पुणे जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पावसाचा जोर कमी होईपर्यंत कार्ला लेणी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा आदेश पुरातत्व विभागाला दिले आहे, असे तहसीलदार बर्गे यांनी स्पष्ट केले.
तसेच लवकरच पुरातत्व विभागाची संयुक्त बैठक घेत पुढील उपाययोजनेबाबत चर्चा करणार असल्याचे बर्गे यांनी सांगितले.
या वेळी मधुसूधन बर्गे यांच्यासह कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे, तलाठी मीरा बोऱ्हाडे, वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीचे सरपंच अर्चना देवकर, पोलीस पाटील अनिल पडवळ, मनसेचे अशोक कुटे, संदीप देवकर, मोरेश्वर पडवळ, संतोष गायकवाड, सचिन देशमुख, एकवीरा देवस्थान व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळासाहेब गायवाड, लेणी व्यवस्थापक अशोक भोपळे उपस्थित होते.
लेणी परिसराच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे. गरज पडल्यास वेळप्रसंगी आंदोलनही करण्यात येईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक कुटे यांनी दै. प्रभातशी बोलताना स्पष्ट केले.