मुंबई – भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh bidhuri) यांनी लोकसभेत बसपा खासदार दानिश अली यांच्याबद्दल अपमानास्पद व अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांचे सदस्यत्यव कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी कॉंग्रेस (Congress) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om birla) यांना लिहिलेल्या पत्रात खान यांनी म्हटले आहे की, संसदेचे वर्णन लोकशाहीचे मंदिर म्हणून केले जाते आणि ते संविधानातील अंतर्भूत तत्त्वे आणि नीतिमूल्यांवर काम करते. आपले राष्ट्र ज्या मूलभूत तत्त्वांवर उभे आहे ते धर्मनिरपेक्षता आहे, आणि ते सर्व धर्म आणि श्रद्धांचा आदर अधोरेखित करते तसेच विविधतेतील एकतेला प्रोत्साहन देते.
बिधुरी यांच्या टिप्पण्या त्याच्या विरोधात आहेत. आणि त्यांची वक्तव्ये आपल्या लोकशाही परंपरांना लाजीरवाणी आहेत. पूर्वी आरएसएस आणि व्हीएचपी सारख्या संघटनांची रस्त्यावरील चर्चेपुरती मर्यादित असलेली भाषा आता भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या माध्यमातून संसदेत दाखल झाली आहे.
बिधुरी यांचीे “लज्जास्पद” विधाने केवळ एका खासदाराचा अपमान नाही तर “आपल्या लोकशाहीच्या गर्भगृहाचा” अपमान आहे. रमेश बिधुरी यांना तात्काळ कायम स्वरूपी निलंबीत करून सभापती बिर्ला यांनी कडक संदेश द्यावा, अशी मागणी खान यांनी केली.