नगर – उद्यान विभागातील ऑनलाइन टेंडरमधील जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी मनपा सभागृहातील माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे. उद्यान विभागातील अमृत योजनेचे टेंडर हे ऑनलाइन प्रसिध्द झाले असुन, 2 कोटी 14 लाख 49 हजार 553 एवढे आहे. हे टेंडर इतर ठेकेदाराला मिळू नेये यासाठी ठेकेदाराच्या नोंदणी ही महापालिकेत झालेली असावी अशाप्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाच्या जाचक अटी टाकलेल्या आहेत.
वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या रक्कमेचे टेंडर हे राज्य व देशात स्पर्धा व्हावी यासाठी ऑनलाइन टाकलेले आहे. वरील अटीमुळे हे टेंडर फक्त महानगरपालिकेच्या विशिष्ट ठेकेदारांनाच मिळावे असा उद्देश आहे. त्यामुळे स्पर्धा कमी होवुन कामाचा दर्जा खालावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून अटी व शर्ती टाकलेल्या आहेत. त्या तातडीने रद्द कराव्यात अन्यथा या विरुध्द आम्हांला नाईलाजाने न्यायालयात दाद मागावी लागेल असे बोराटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.