पिंपरी – कॅनेरा बॅंकचे एटीएम जिलेटीनचा स्फोट घडवून आणत उडविले. यात एटीएम सेंटरचे नुकसान झाले असले तरी रोकड सुरक्षित आहे. मात्र पहाटेच्यावेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे. नवीन आयुक्त येण्यापूर्वीच चोरट्यांनी ही सलामी दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्रिवेणीनगर, तळवडे रोड येथे कॅनेरा बॅंकेचे एटीएम आहे. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी जिलेटीनचा स्फोट घडवून एटीएम उडवून दिले. यामुळे एटीएम सेंटरचे मोठे नुकसान झाले. मात्र आतील रोकड सुरक्षित राहिली. पहाटेच्यावेळी झालेल्या स्फोटामुळे नागरिक जागे झाले. यामुळे चोरटे दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.