एशियन पेन्टस्‌च्या शेअरमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते? वाचा सविस्तर…

आज रंग शब्द उच्चारला की, एशियन पेन्टस्‌ आणि या कंपनीचा सुप्रसिद्ध गट्टू नावाच्या मुलाचे रेखाचित्र नजरेसमोर येते. हर घर कुछ कहता है… असे म्हणत ही कंपनी गावागावात आणि घराघरात पोचली आहे. भारतातील कुठल्याही पेन्ट कंपनीच्या तुलनेत ही कंपनी दुपटीने मोठी आहे. 1967 पासून पेन्ट उद्योगातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. गेली 50 वर्षे कंपनीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. 

एवढेच नव्हे तर जगभरातील डेकोरेटिव्ह कोटिंग क्षेत्रातील जगातील प्रमुख पाच कंपन्यांमध्ये एशियन पेन्टने स्थान मिळवले आहे. 1942 मध्ये चार मित्रांनी एकत्र येऊन रंगाच्या दुनियेत मोठी स्वप्ने घेऊन उडी मारली आणि 1945 मध्ये एशियन ऑईल अँड पेन्ट कंपनी या नावाने कंपनी सुरु केली. पाहता पाहता या कंपनीचा मोठा विस्तार झाला आणि आता एशियन पेन्टस्‌ या नावाने ती जगभर प्रसिद्ध आहे.

आज एशियन पेन्टचे देशात पुढील ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. अंकलेश्‍वर व सारिगाम (गुजरात), पटनचेरू (तेलंगणा), श्रीपेरुमबुदूर (तमिळनाडू), कसना (उत्तर प्रदेश), रोहतक (हरियाना), खंडाळा आणि तळोजा (महाराष्ट्र) या व्यतिरिक्‍त 16 देशांमध्ये कंपनीचे कारखाने आहेत आणि एकूण 65 देशांमध्ये कंपनी कार्यरत आहे. या कंपनीच्या प्रगतीचा आलेख कायम सप्तरंग उधळत आलेला आहे.

आज ही कंपनी नुसते रंग तयार करत नाही तर या उद्योगात त्यांनी विविधता आणली आहे. आज देखणे, नीटनेटके, छान घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा लोकांच्या घरी जाऊन त्यांना रंगसंगती सुचवणे, घर, त्यातील फर्निचर, प्रकाश योजना, मोकळ्या जागा आणि इतर बारीकसारीक गोष्टींचा विचार करून एशियन पेन्टस्‌चे तज्ज्ञ घरपोच सल्ला देतात. आता वास्तुशास्त्राप्रमाणे रंगशास्त्रही तेवढेच महत्त्वाचे बनले आहे. तुम्हाला घराचे त्रिमितीय रंगकाम किंवा द्विमितीय नियोजन आधीच पाहायला मिळते.

अशा पर्सनल टच देणाऱ्या कंपनीचे तुमच्याआमच्या सारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे फक्त 11.92 टक्के शेअर आहेत. त्यामुळेच कंपनीचा सप्तरंगी आलेख दरवर्षी वरची दिशा दाखवत असेल तर या करोनानंतरच्या नव्या जगातील रंगांचा अनुभव घेण्यासाठी कंपनीच्या शेअरमधील दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

मंगळवारचा बंद भाव –
रु. 3,015.00

वाचकांसाठी सूचना :या सदरातील लेखन सर्वसाधारण माहिती स्वरूपाचे असते. गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला तसेच परिस्थितीनुरूप सर्व साधकबाधक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.