पुणे : ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या वतीने दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. १६ आणि १७ डिसेंबर या दोन दिवस हा संप चालणार आहे. हा संप प्रामुख्याने सरकारच्या लोकसभा अधिवेशनात जे बँकिंग कायदा अधिनियम २०२१ हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येत आहे. या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे.
बँकिंग कायदा अधिनियम २०२१ हे विधेयक मंजूर झालेतर सरकारकडून करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण या वर्षात करणे शक्य होईल आणि यानंतर इतरही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करणे शक्य होईल.
जी गोष्ट सरकारकडून दोन वर्षांपूर्वीच ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेवेळी मांडण्यात आली होती की फक्त तीन ते चार बँका सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्यात येतील. उर्वरित सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्यात संपाच्या दिवशी बँक कर्मचारी मोर्चे, निदर्शने, मेळावे, मानवी साखळी, धरणे यांसारखे कार्यक्रम संघिटत करत आहेत. हे सर्व कार्यक्रम कोरोना महामारीचे निर्बंध पाळून आयोजित केले जात आहेत.
शिवाजीनगर येथे गुरुवारी (दि.१६) सकाळी साडेदहा वाजता बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयात या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी (दि.१७) स्टेट बँक ऑफ इंडिया, कोषागार शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आला आहे.