अनेक नामवंतांना अटक, जंतर मंतरला कारागृहाचे स्वरूप
अहमदाबादमध्ये लाठीमार, दिल्लीत इंटरनेट सेवा खंडित
संपूर्ण देशात कॉंग्रेसची आणि डाव्या पक्षांची निदर्शने
दिल्ली, बंगळुरूत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, धरपकडीचे सत्र सुरूच
मंगळुरू/नवी दिल्ली/ मुंबई/ लखनऊ : सुधारीत नागरिकत्व कायद्याला (का) विरोध करण्यासाठी देशभरात शेकडो निदर्शकांना ताब्यात घेतले. कर्नाटकातील मंगळुरू येथे पोलिस आणि निदर्शकांत झालेल्या संघर्षात दोन जण मरण पावले. लखनऊमध्येही गोळ्यांनी जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कर्नाटकचे जीवन गुरूवारी ढवळून निघाले. मंगळुरू येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. अशीच निदर्शने कर्नाटकात ठिकठिकणी झाली. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, रामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदेर, विचारवंत योगेंद्र यादव आणि डाव्यांचे नेते सीताराम येचुरी आणि डी राजा यांना अटक करण्यात आली.
भारतीय जनता पक्ष सत्तेत असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि कर्नाटकांत जमाबंदीचे आदेश व्यापक स्वरूपात लागू करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील संबळ येथे सरकारी बस आंदोलकांनी पेटवली त्यानंतर तेथील इंटेनेट सेवा खंडित करण्यात आली. कर्नाटकातही इंटरनेट सेवा हिंसाचारग्रस्त भागात खंडित केली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच दिल्लीतील इंटरनेट सेवा खंडित केली. 20 मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आली.
लखनऊमध्ये निदर्शकांनी पोलिस ठाणेच पेटवून दिले. शहरात अनेक वाहने पेटवण्यात आली. एक दूरचित्रवाणी वाहिनीची ओबी व्हॅन पेटवून देण्यात आली. परिवर्तन चौक येथे आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांनी बेदम लाठीमार करून हिंसक आंदोलनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अनेक शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. उत्तर प्रदेशातील संभल येथे बसेस पेटवण्यात आल्या. तेथील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
लखनऊमधील वातावरण हिंसक बनताच निदर्शनेही हिंसक बनली. हिंसक जमावाने रस्त्यातील मोटारी आणि अन्य वाहनांची मोडतोड सुरू केली. लखनऊ प्रेस क्लबमध्ये जमलेल्या पत्रकारांनीही हाच प्रकार अनुभवला. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. पोलिसांना आव्हाने देत सुरू असलेल्या निदर्शनांमुळे लखनऊमधील रस्त्यांना युध्दभूमीचे स्वरूप आले होते.
दरम्यान, मंगळुरू पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पाच पोलिस ठाण्यांच्या आवारात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या हिंसाचारामुळे इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती मंगळुरूचे पोलिस आयुक्त पीएस. हर्ष यांनी दिली. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सिंधू बी. रूपेश यांनी मंगळुरूतील सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे.
मंगळुरूत निदर्शकांनी वाहने पेटवली आणि पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी प्रथम लाठीमार करून निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र निदर्शक आणखी हिंसक बनले. त्यामुळे जमाव काबूत आला नाही. त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव शांत होत नसल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सर्वत्र व्हायरल झालेल्या छायाचित्रात पोलिसांच्या बंदुका निदर्शकांच्या दिशेने असल्याचे पहायला मिळाले.
इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यासह अनेक मान्यवरांना अटक करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. बंगळुरूत का कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला विरोध करण्यासाठी निदर्शक जमू नयेत म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते.
बंगळुरू, म्हैसुर, कलबुर्गी, मंगळुरू, बेळगाव, हुबळी, शिमोगा, हसन, चिकमंगळूर आणि चिकबल्लापूर येथे पुढील तीन दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. निदर्शकांनी हम लेकर रहेंगे आजादी, का रद्द करा, का हा घटनाविरोधी अशा घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे बंगळूरूत अनेक ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
देशात अन्यत्रही हिंसाचार झाल्याचे वृत्त हाती येत असून अहमदाबादमध्ये पोलिसांनी लाठीमार केला. हैदराबाद मध्येही विद्यापीठातून प्रदर्शन मैदानाकडे जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. डाव्या पक्षांनी जाहीर केलेल्या बंदमुळे बिहारमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. अगदी याउलट कोलकाता आणि मूंबईत शांततापूर्ण निदर्शने पहायला मिळाली. या दोन्ही राज्यात या कायद्याला विरोध करणारी बिगर भाजपा सरकार सत्तेवर आहे.
काविरोधातील आंदोलनाबाबत गृहमंत्रालयाची तातडीची बैठक
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे (का) झालेल्या आंदोलनाला देशव्यापी स्वरूप येऊ लागल्याने ते रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीच्या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती हाती येत आहे. या बैठकीत हे आंदोलन घ्यायची काळजी आणि आंदोलकांबाबतची भूमिका याबाबत सुचना देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्री अमित शहा स्वत: या बैठकीत मार्गदर्शम करणार आहेत, असे समजते.
लखनऊमध्ये पोलिस चौकी पेटवली
सुधारीत नागरिकत्व कायद्या विरोधात होणाऱ्या निदर्शनांना उत्तर प्रदेशात हिंसक वळण लागले. लखनऊमध्ये निदर्शकांनी पोलिस ठाणेच पेटवून दिले. शहरात अनेक वाहने पेटवण्यात आली. एक दूरचित्रवाणी वाहिनीची ओबी व्हॅन पेटवून देण्यात आली. परिवर्तन चौक येथे आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांनी बेदम लाठीमार करून हिंसक आंदोलनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अनेक शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. उत्तर प्रदेशातील संभल येथे बसेस पेटवण्यात आल्या. तेथील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
लखनऊमधील वातावरण हिंसक बनताच निदर्शनेही हिंसक बनली. हिंसक जमावाने रस्त्यातील मोटारी आणि अन्य वाहनांची मोडतोड सुरू केली. लखनऊ प्रेस क्लबमध्ये जमलेल्या पत्रकारांनीही हाच प्रकार अनुभवला. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. पोलिसांना आव्हाने देत सुरू असलेल्या निदर्शनांमुळे लखनऊमधील रस्त्यांना युध्दभूमीचे स्वरूप आले होते.
न्यायलयाचा निषेध आणि देशव्यापी रूप
दिल्ली उच्च न्यायलयाने आंदोलक विद्यार्थ्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा देण्यास नकार दिला. त्यावेळी वकीलांनी न्यायलयातच निषेधाच्या घोषणा दिल्या. जंतर मंतर येथे मोठ्या संख्येने निदर्शक जमले. आदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार निर्दयी कारवाई करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या, सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न करेल तेवढा तो आवाज मोठा होत जाईल. प्रत्येक भारतीयाला निदर्शने करण्याचा हक्क भाजपा हिरावून घेत आहे. प्रख्यात वकील प्रशांत भूषण आणि हर्ष मांडेर यांना अटक करण्यात आली. दिल्लीच्या आयटीओ भागात ही कारवाई करण्यात आली. कॉंग्रस नेते हरिश रावत आणि रिपूण बोरा यांनी आंदोलनात भाग घेतला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने जोरदार निदर्शने केली. विधानसभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने एकच गोंधळ उडाला.
अटक केलेल्या नामवंताची नावे
रामचंद्र गुहा, इतिहासकार, बंगळुरू
डी. राजा, नेते भाकप,
सिताराम येचुरी, अध्यक्ष माकप
नीलोत्पल बसू, नेते माकप
वृंदा कारत, नेत्या माकप
प्रशांत भूषण, वकील, नवी दिल्ली,
धर्मवीर गांधी, माजी खासदार, पतियाळा
संदीप दीक्षित, माजी खासदार, दिल्ली
योगेंद्र यादव, अध्यक्ष स्वराज भारत
कर्नल जयवीर, स्वराज्य भारतच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष
सुचेता डे, एआयसएच्या अध्यक्ष
उमर खालीद, युवा नेता
नदीम खान, नेता युनायटेड अगेन्स्ट हेटचे अध्यक्ष