पुणे – इन्स्टिट्युट ऑफ चार्टर अकाऊंटस् ऑफ इंडियाच्या डब्ल्युआयआरसी पुणे शाखा तर्फे आयोजित ११ व्या ‘श्री रामकृष्ण ऑईल मिल्स् करंडक’ सीए क्रिकेट लीग (सीएसीएल) २०२४ स्पर्धेत एमएसीए इलेव्हन आणि रॉयल्स् इलेव्हन या संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
शिंदे हायस्कूल, सहकारनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर सी. याच्या नाबाद ७१ धावांची खेळीच्या जोरावर एमएसीए इलेव्हन संघाने एसबीएच स्मॅशर्सचा ७ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसबीएच स्मॅशर्स संघाने १०३ धावांचे आव्हान उभे केले. सोहम बाथे याने ३० चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला.
प्रत्येक षटकामागे सरासरी १० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या एमएसीए इलेव्हन संघाने नवव्या षटकामध्ये विजयाला गवसणी घातली. विजयाचा शिल्पकार सागर सी. ठरला. सागर याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा चोपल्या. त्याला आनंद दायमा (१३ धावा) आणि लोकेश नहार (नाबाद १४ धावा) यांनी उत्तम साथ दिली व संघाला अंतिम फेरीत पोचवले.
कुणाल जामवर याच्या अष्टपैलू खेळीमुळे रॉयल्स् इलेव्हन संघाने एएनआरके डायनामोज् संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एएनआरके डायनामोज् संघाने ७४ धावा धावफलकावर लावल्या. अर्थव गुजराथी (२५ धावा), ऋषीकेश वांढेकर (२१ धावा) आणि विशाल बुरद (१५ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. रॉयल्स् इलेव्हनच्या तेजस बंसल (नाबाद ३२ धावा), सौरभ सोनी (१८ धावा) आणि कुणाल जामवर (१७ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर संघाने ६.२ षटकात आणि १ गडी गमावून सहज विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी गाठली.