नारायणगाव (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-खोडद रस्त्यावरील नालासफाईचे काम घेतलेल्या ठेकेदार संदीप बांगर यांनी दादागिरी करत रस्त्याच्या कडेला लावलेले व्यवसायाचे बोर्ड स्वतःच्या जेसीबीने तोडून फेकून दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता ज्ञानदेव रायकर यांनी ठेकेदार संदीप बांगर यांना साथ देत बघ्याची भूमिका घेतली.
पावसाळ्यात खोडद रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पावसाच्या पाण्याने गाळ जमा होऊन पाणी वाहण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. नाल्यातील गाळ काढण्यासाठी संदीप बांगर यांनी काम देण्यात आलेले आहे. ठेकेदाराने सोमवारी (दि.20) संध्याकाळी पाच वाजता नाला सफाई करण्यासाठी स्वमालकिच्या जेसीबीने रस्त्याच्या कडेला असलेले ठराविक व्यावसायिकांचे बोर्ड तोडून फेकून दिले; परंतु ओळखीच्या अथवा राजकारणाशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांच्या बोर्डला हात लावला नाही.
व्यापाऱ्यांचा नाला सफाईला विरोध नव्हता; परंतु खोडद रस्त्यावरील सर्वच अनधिकृत बोर्ड काढून टाकणे अपेक्षित असताना ठराविकच बोर्ड तोडून फेकून का दिले असा प्रश्न सहायक अभियंता रायकर यांना विचारला. त्यावर तुम्ही कुठे आमची परवानगी घेऊन बोर्ड लावले असा प्रति प्रश्न केला. त्यांनी दिलेले उत्तर योग्य होते; परंतु आजपर्यंत खोडद रस्त्यावरील किती व्यावसायिकांनी परवानगी घेऊन बोर्ड लावले आहे याचे उत्तर दिले नाही.
आजही खोडद रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण होत असल्याने अधिकाऱ्यांनी बसस्थानकापासून रितसर कारवाई करुन अतिक्रमण दूर केल्यास स्वागतार्ह आहे; परंतु जाणिवपूर्वक भेदभाव करून ठराविक व्यावसायिकांवर कारवाई करणे हे योग्य नाही. कायदा सर्वांसाठी सारखा असतो याचे तारतम्य अधिकाऱ्यांनी ठेवायला हवे. ज्या नालासफाईसाठी व्यावसायिकांचे बोर्ड तोडले त्या नाल्यातील फावडाभर गाळही आजपर्यंत काढला नाही.
ठेकेदार संदीप बांगर यांना नालेसफाईचे काम देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता ज्ञानदेव रायकर उपस्थित असताना त्यांनी व्यापाऱ्यांशी वाद घालायला नको होता. काम करताना त्यांना कोणाचेही बोर्ड तोडायचा व अर्वाच्य भाषेत बोलण्याचा अधिकार नाही.
– चंद्रशेखर तोतावार, अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जुन्नर
नालासफाईचे केलेले काम कोणाचे नुकसान व्हावे या हेतूने केलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वखर्चाने नालासफाईचे काम केले आहे. येथून पुढे रस्त्याचे काम करताना संयमाने व शांततेने समोरच्याचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. व्यवसायिकांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. राहिलेले नालासफाईचे काम व्यापाऱ्यांचे नुकसान न होता लवकरच करण्यात येईल.
– संदीप बांगर, ठेकेदार