आयुक्त करणार आज अंदाजपत्रक सादर; शहराच्या विकासाची दिशा की “दशा’
पुणे – करोनाच्या आर्थिक संकटामुळे मिळकतकर वगळता महापालिकेच्या इतर सर्वच उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत महापालिकेस केवळ 3285 कोटींचा महसूल मिळाला असून आतापर्यंत त्यातील तब्बल 2993 कोटी रुपये खर्चही झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत जेमतेम 250 ते 300 कोटी रुपयेच शिल्लक असताना, महापालिका आयुक्त विक्रम कुमार उद्या (शुक्रवारी) महापालिकेचे 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत.
त्यामुळे, घटलेल्या उत्पन्नाचा भार आयुक्त कसे पेलणार? यावर शहराच्या विकासाची दिशा निश्चित होणार आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने दि. 1 एप्रील 2020 ते 15 जानेवारी 2021 अखेर लॉकडाऊन मध्येही तब्बल 860 कोटी रुपयांचा भांडवली खर्च केल्याची माहिती आहे. तर, महसूली खर्चापोटी 2132 कोटींचा खर्च झाला आहे.
महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षाची सुरुवातच करोना संकटामुळे लॉकडाऊनमध्ये झाली. त्या पूर्वीच पालिकेच्या स्थायी समितीने तब्बल 7 हजार 300 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये महापालिकेचे जवळपास सर्वच उत्पन्न स्त्रोत घटले.
केवळ मिळकतकर आणि शासनाकडून येणाऱ्या जीएसटी अनुदानातूनच महापालिकेस निश्चित उत्पन्न मिळत राहिले. मात्र, त्याच वेळी बांधकाम विभाग, शासकीय अनुदान, तसेच भुई भाडे, पाणीपट्टी अशा वेगवेगळ्या स्रोतांमधून येणारे उत्पन्न मात्र कमालीचे घटले आहे.
त्यामुळे आर्थिक वर्षाचे पहिले दहा महिने संपल्यानंतरही पालिकेच्या तिजोरीत अंदाजित उत्पन्नाच्या केवळ 45 टक्केच महसूल जमा झाला असल्याचे चित्र आहे, तर मार्च अखेरपर्यंत त्यात केवळ 200 ते 300 कोटींची वाढ अपेक्षित आहे. चालू अंदाजपत्रकात तब्बल 50 टक्के तूट असताना आयुक्त पुणेकरांसाठी काय मांडणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.