फलटण – डच कंपनी सोलिडरीडेड व नुट्रेको, बारामती (जि. पुणे) येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलेपमेंट ट्रस्ट आणि फलटण येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस् यांनी एकत्र येऊन दुग्ध व्यवसाय व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासाची योजना तयार केली आहे. याबबातचा सामंजस्य करार “गोविंद’च्या पुढाकाराने बारामती येथे नुकताच करण्यात आला.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. जयंत पाटील साहेब, कृषिमंत्री दादा भुसे, खा. सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करारावर सह्या करण्यात आल्या. गोविंद मिल्कच्यावतीने संचालक सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी करारावर सही केली. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सने सुरुवातीपासून पशुपालकांच्या विकासासाठी काम केले आहे. कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत पोहोचवून उत्पन्नवाढ, उत्पादन खर्च कमी करणे व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने कमी खर्चाचा व अधिक फायद्याचा मुक्तसंचार गोठा, वर्षभर हिरवा चारा साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा मुरघास तयार करण्याचे तंत्रज्ञान, कमी पाण्यात मातीविरहीत चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञान, जनावरांच्या आजारांवर घरच्या घरी उपचारांसाठी गोविंद होम हर्बल गार्डन, अशा योजना राबवून पशुपालकांच्या जीवनात आनंद निर्माण केल्याचे सत्यजितराजे यांनी सांगितले.
ट्रस्ट डेअरी प्रकल्पामुळे प्रामुख्याने पुणे व सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रगत देशातील तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कमी खर्चात अधिक दूध उत्पादन व अधिक फायदेशीर शाश्वत व्यवसायासाठी मदत होणार आहे.