पुणे – कात्रज ते स्वारगेट रस्त्यावर बीआरटी बसेसचे संचलन सुरू होवून महिना पूर्ण झाला. मात्र, बसस्टॉप त्रुटीयुक्तच आहेत. अद्यापही स्वयंचलित दरवाजे बसविले नाहीत. त्यामुळे बसस्टॉपवर थांबणे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळच असल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र, बसेसना अपडेटेड टॅग नसल्याने हा खर्च निरर्थक ठरणार असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात.
कात्रज ते स्वारगेट हा बहुचर्चित बीआरटी मार्ग 5 फेब्रुवारीनंतर खुला केला. मात्र, अद्याप हा मार्ग प्रायोगिक असून उद्घाटनाच्या महिनाभरानंतरही पायाभूत सुविधांचाच अभाव आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. डिजिटल डिस्प्ले बोर्ड, अद्ययावत यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे, कंट्रोलरसाठी केबिन आदींची अजूनही वाणवा आहे. याबाबत पीएमपीच्या प्रवासी मंचाच्या वतीने सचिव संजय शितोळे यांनी महापौरांकडे लेखी पत्र दिले आहे. स्वयंचलित दरवाज्यांसाठी पालिकेकडे पाठपुरावा करत असल्याचे पीएमपीच्या बीआरटी विभागाचे प्रमुख गव्हाणे यांनी सांगितले.
कात्रज ते स्वारगेट मार्गावरील बसथांब्यांचे दरवाजे “मॅन्यूअल’ आहेत. याशिवाय ये-जा करणाऱ्या बसेसची माहिती देण्यासाठी डिजिटल डिस्प्ले बोर्ड नसल्याने थांब्यावर येणाऱ्या बसेस पाहण्यासाठी प्रवाशांना दरवाजांच्या टोकाशी उभे राहावे लागत आहे. तर, प्लोअरच्या दोन्ही बाजूंना लोखंडी चौकोनी बार बसवले आहे. हे असुरक्षित असल्याने अपघाताचा धोका संभावतो. थांब्यांच्या फ्लोअरची उंची रेल्वे प्लॅटफॉर्मप्रमाणे असल्याने या ठिकाणी प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच उभे राहावे लागते.
बीआरटी बसथांब्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र, स्वयंचलित दरवाजे नसताना बसेसचे संचलन सुरू करणे हे प्रवाशांसाठी असुरक्षित. पालिकेचे हजारो कोटी रुपयांचे बजेट असताना अंदाजे 1 कोटी रुपयांचा खर्च स्वयंचलित दरवाजांसाठी न करणे, ही निंदनीय गोष्ट असल्याचे मत शितोळे यांनी सांगितले.
बीआरटी थांब्यांच्या स्वयंचलित दरवाजांना “आरएफआयडी’ टॅग बसवावा लागतो. त्याचप्रमाणे हा “टॅग’ बसेसनादेखील असणे गरजेचे आहे. पण बसेस वेगवेगळ्या कंपनीच्या असून, कोणत्याही बसेसना हे टॅग बसवलेले नाहीत. बसथांब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासाठी 1 कोटी 10 लाखांचा खर्च अपेक्षित असून, याबाबतची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र “आरएफआयडी’ टॅग नसताना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा खर्च विनाकारण करावा लागेल.
– व्ही.जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका