नवी दिल्ली -भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या आडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या विरोधात अल्पवयीन महिला कुस्तीपटूने पोलिसांना दिलेल्या जबाबात लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ब्रिजभूषण यांना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंचेही जबाब आता पोलीस नोंदवून घेणार आहेत.
दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर यापूर्वीच दोन तक्रारी दाखल केल्या असून, या प्रकरणात खटलादेखील चालवला जाणार आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याबाबत गुन्हा दाखल केला गेला असून, यात पॉक्सो कायद्याअंतर्गत देखील एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी विनेश फोगाट, साक्षी मलिका तसेच बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटू जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत.