– प्रशांत सातपुते महाराष्ट्रात विदर्भात जंगलाचे प्रमाण सर्वात जास्त असले तरी पश्चिम घाटात जैवविविधतेचे प्रमाण अधिक आहे. वन्यजीव, वनसंपदेचा थाट म्हणजेच आपला पश्चिम घाट. एकूणच जंगलातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील वन्यजीव व वनसंपदा याबाबत या लेखात माहिती दिली आहे. हिमालय पर्वत, गंगेचे खोरे, पंजाब-अरवली-विंध्य व राजमहाल डोंगर हा डोंगराळ पट्टा, दख्खन पट्टा आणि कर्नाटक-आंध्रपासून रामेश्वरपर्यंत पसरलेला प्राचीन दगडांचा भाग अशा 5 विभागांत भारत पसरलेला आहे. त्याचप्रमाणे कोकण, तापी-पूर्णा खोरे, वर्धा-वैनगंगा खोरे, गोदावरीचे खोरे आणि पूर्वीच्या काळी कुंतल भाग म्हणून ओळखला जाणारा कृष्णेचे खोरे अशा उपप्रदेशात महाराष्ट्राचे भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रूप उभे ठाकले आहे. भारतामध्ये 2017 नुसार 7 लाख 67 हजार 419 चौकिमी वनक्षेत्र आहे. देशाच्या तुलनेत राज्याचे 8 टक्के वनक्षेत्र आहे. जगातील 7.6 टक्के सस्तन प्राणी, 12.6 टक्के पक्षी, 6.2 टक्के सरीसृप, 4.4 टक्के उभयचर प्राणी, 11.7 टक्के मासे आणि 6 टक्के सपुष्प भारतात सापडतात. महाराष्ट्राचे 61 हजार 579 चौकिमी वनक्षेत्र आहे. राज्यातील एकूण वन व वृक्ष क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20.1 टक्के आहे. महाराष्ट्रात वनस्पतींच्या 2,513, सस्तन प्राण्यांच्या 129, पक्ष्यांच्या 563, सरीसृपच्या 160, उभयचरांच्या 53, मासांच्या 15 आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या 5,440 जाती सापडतात. समुद्रकिनारा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणातला सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा आहे. तर पूर्वेकडचा भामरागड, गडचिरोली इथल्या सातपुडा पर्वतरांगांनी त्याची सीमा तयार केली आहे. किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश अशी प्राकृतिक रचना असणाऱ्या महाराष्ट्रात सदाहरित वने, निम सदाहरित वने, पानझडी वने, झुडपी व काटेरी वने आणि खारफुटी वने अशी वनसंपदा आहे. सदाहरित व निम सदाहरित वनात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर तर पानझडी वनात हरीण, कोल्हे, लांडगे, तरस हे आढळतात. काटेरी वनात साळींदर, ससा, हरीण, तरस हे प्राणी आणि भारतद्वाज, मोर, घुबड इत्यादी पक्षी आढळतात. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये विविध जातींचे सर्प आढळतात. झुडपी व काटेरी वनात दुर्मिळ होत जाणारा माळढोक आढळतो. धोक्यात येणाऱ्या प्राणीजीवन व पक्षीजीवन यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वन विभागाने राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये उभारली आहेत. युनिस्कोचा जागतिक वारसा स्थळांमध्ये जैवविविधतेच्या जगातील 39 आणि भारतातील 2 हॉटस्पॉट ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश आहे. पश्चिम घाटातील विशेषत: कोल्हापूर वनक्षेत्र विभागातील चार स्थळांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य, सांगली जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, कास पठार याचा समावेश आहे. समांतर विकास मानवाच्या विकासासाठी प्रकल्प, सोई-सुविधा राबवताना पर्यावरणाच्या विकासाचाही विचार व्हायला हवा. मानव आणि पर्यावरण या दोघांचा समांतर विकासाचा विचार झाला तरच भविष्य आहे. पर्यावरणाला हानिकारक ठरणारे प्रकल्प हे अन्य ठिकाणी वळवता येऊ शकतात. नाणार प्रकल्प हा यातीलच एक घेतलेला निर्णय आहे. सध्या बारसूचा विषय चर्चेत आहे. जंगलातून जाणारे रस्ते वा रेल्वे मार्ग हे राखीव संरक्षित जंगल वगळून अन्य मार्गाने वळवल्यास पर्यावरण आणि मानव दोघांच्याही विकासाचा समतोल साधला जाऊ शकतो. यासाठी होणारा खर्च हा वाचवल्या जाणाऱ्या वन्यजीव आणि वनसंपदेपेक्षा कमी असेल. किंबहुना अनेक ठिकाणी असणाऱ्या घाटमार्गांचा उपयोग तसेच पर्याय पाहता या भागात नव्याने आणखी जवळचा मार्ग करण्याची खरोखरच गरज आहे का? हा विचार निश्चितच वन्यजीव तसेच वनसंपदेला संवर्धन करणारा ठरवू शकेल. पुढील 25 वर्षांतील स्थिती प्रो. टोनी बार्नोस्की या शास्त्रज्ञाने सध्या होत असलेल्या पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम अभ्यासले आहे. 2045 सालापर्यंत जगाची लोकसंख्या 9 अब्ज होईल आणि त्याचवेळी जागतिक परिसंस्थेच्या ऱ्हासामुळे हवामानात अनेक परिणाम होतील. या बदलाला अनुकूलन करणे मनुष्यजातीला शक्य होईलच असे नाही. त्यामुळे आताच आपल्याला परिसंस्था आधारित अनुकूलन स्वीकारावे लागेल. वनअभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांनी संशोधन करून तयार केलेला प्राणीकोश, पक्षीकोश, मत्स्यकोश आणि वृक्षकोश वनविभागासाठी तसेच जगातील वनअभ्यासकांसाठी मौल्यवान ठरणार आहेत. विदर्भातील 40-45 वर्षांच्या प्रदीर्घ सहवासात चित्तमपल्ली यांचे जंगलभ्रमंती आणि संशोधन देशाच्या वन्यजीव आणि वनसंपदेसाठी फायदेशीर ठरणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एकूण जमिनीच्या 33 टक्के जंगल असायला हवे, असा एक संकेत आहे. देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशात 67 ते 69 टक्के जंगल पश्चिम घाटात होते. स्वातंत्र्यानंतर आज केवळ 37 टक्के उरले आहे. पश्चिम घाटात जंगल कमी असले तरी जैवविविधता अधिक आहे. याच्या उलट विदर्भात जंगले अधिक परंतु जैवविविधता कमी आहे.वन्यजीव आणि वन्यसंपदेच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रबोधनामुळे भविष्यात त्याची व्याप्ती वाढू शकते. मानव निसर्गाचाच एक घटक आहे. वन्यजीव आणि वनसंपदा यांच्या अस्तित्वावर मानवाचे जीवन टिकून आहे. मानवाच्या समृद्ध जीवनाच्या विकासासाठी वन्यजीव आणि वनसंपदा यांची विपुलता आणि समृद्धीकरणही असायलाच हवे.