लखनौ – महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरणसिंह आता शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. आपली ताकद दाखवून देण्यासाठी त्यांनी निवड केली आहे 5 जूनची. हा दिवस भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस आहे. यावेळी प्रचंड गर्दी जमवून आपली ताकद दाखवण्याचा ब्रिजभूषण यांचा इरादा आहे.
त्यासाठी अयोध्येतील रामकथा पार्क येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना ब्रिजभूषण यांचे प्रतिनिधी संजीव सिंह म्हणाले की, गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणातील तरतुदींचा दुरूपयोग करणाऱ्यांना कसे रोखायचे याबाबत रॅलीत विचारमंथन केले जाणार आहे. सगळ्या बुध्दीजीविंना त्यासाठी बोलावले जाणार आहे.
अयोध्येत होणाऱ्या या जनचेतना रॅलीत देशभरातील साधू, संत, महंत, राजकीय आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांना बोलावले जाणार आहे. कायद्याच्या जाणकारांनाही यावेळी आमंत्रण असेल. कोणाचेही नाव न घेता ते पुढे म्हणाले की जे लोक कायद्यातील त्रुटींचा आधार घेत कोणाचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत आहेत,
त्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली गेली पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणीही कायद्याचा एक साधन म्हणून असा वापर करू शकणार नाही. उत्तर प्रदेशातील 75 जिल्हे, त्याचसोबत दिल्ली, हरियाणा, बिहार, पंजाब, राजस्थान आणि अन्य राज्यांतून लोकांना या रॅलीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 11 लाख जणांची गर्दी जमवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.