पुणे – नऱ्हे येथील एका उद्योजकाला महामार्गावर चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन 50 लाखाची खंडणी मागण्यात आली होती. या गुन्हयातील आरोपींचा भारती विद्यापीठ पोलिसांनी छडा लावला आहे. खंडणी मागणारे आरोपी हे तक्रारदार उद्योजकाच्याच कंपनीतील कामगार आहेत. त्यांनी जादा पैशाच्या लोभापाई साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला.
सौरभ संजय बनसोडे (21, वारजे ), पवन मधुकर कांबळे (22, धायरी ), संकेत योगेश जाधव (24, नन्हे ) आणि कृष्णा भिमराव भाबट (19, धयरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार उद्योजक अभिजीत भोळे यांची नऱ्हेमध्ये महावितरणसाठी ट्रांन्सफॉर्मर बनविण्याची कंपनी आहे. कंपनीतून घरी जात असताना त्यांची कार रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली होती. यानंतर व्हॉटसअप कॉल करुन त्यांना 50 लाखाची खंडणी मागीतली होती. त्यांनी तक्रार देताच पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला होता.
दरम्यान अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे यांना खबर मिळाली की खंडणी मागणाऱ्या व्यक्ती त्यांच्याच कंपनीतील कामगार आहेत. त्यानूसार सापळा रचून कंपनीतील कामगार पवन, संकेत आणि सौरभ यांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार कृष्णालाही अटक केली गेली. आरोपींना फिर्यादी अभिजीत भोळे यांच्याकडे किती संपत्ती आहे याची कल्पना होती. तसेच ते ऑफिसला कोणत्या गाडीतून कधी येतात, कधी जातात, कोणत्या मार्गाने जातात याची माहीती होती.
यामुळे त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने कट रचला. त्यांना रस्त्यात अडवले तेव्हा दोन कामगार त्यांच्या साथीदारांना भोळे यांची ओळख पटवण्यासाठी रस्त्यात थांबले होते. आरोपींना झटपट पैसे कमवायचे असल्याने त्यांनी हा मार्ग अवलंबला. मात्र तांत्रीक व इतर तपासात आरोपी निष्पन्न झाले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.