नगर, (प्रतिनिधी) – शासकीय विहार मंजूर करण्यासाठी सरपंचपती असलेल्या प्राध्यापकाला १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. शामराव माणिकराव बारस्कर (वय ५३, रा. प्राध्यापक जामखेड महाविद्यालय) असे या प्राध्यापकाचे नाव असून, याप्रकरणी वाघा गावाचा ग्रामसेवक नेताजी शिवाजी भाबड (वय ५०) अशा दोघांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील वाघा येथील गट क्रमांक ११४ मध्ये तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे दोन हेक्टर जमीन आहे. तक्रारदार यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजने अंतर्गत विहिरीसाठी प्रस्ताव मौजे वाघा(ता. जामखेड) ग्रामपंचायतीत सादर केला होता. सदर प्रस्ताव तयार मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी पंचायत समितीकडे पाठविण्याच्या बदल्यात ग्रामसेवक भांबड व सरपंचांचे पती प्राध्यापक बारस्कर, अशा दोघांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजारांच्या लाचेची मागणी केली.
यासंदर्भात तक्रारदार यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंक विभागाकडे केली. त्यानुसार पडताळणीत ग्रामसेवक भांबड याने लाचेची रक्कम सरपंच पती बारस्कर याच्याकडे देण्यास सांगितल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यात प्राध्यापक बारस्कर हा लाच घेताना अलगद अडकला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, शरद गोर्डे, राधा खेमनर, बाबासाहेब कराड, गजानन गायकवाड, हारुण शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.