Milind Deora – मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे ते पुत्र आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी शिंदे गटातील अनेक नेतेमंडळी देखील उपस्थित होते.
मिलिंद देवरा यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली आणि म्हटले, की”आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाचा समारोप होत आहे. मी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाशी कुटुंबाचे ५५ वर्षांचे नाते आहे, मी कॉंग्रेसचे सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा अनेक वर्षांपासून अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
मिलिंद देवरा यांनी २०१२ ते२०१४ या काँग्रेस कार्यकाळात केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान आणि जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षही होते.
देवरा यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केलेल्या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी हा पक्ष सोडला असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी माजी नगरसेवक सुनील नरसाळे, प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेवक रामबच्चन मुरारी, माजी नगरसेविका हंसा मारू, माजी नगरसेविका अनिता यादव, रमेश यादव, प्रकाश राऊत, मारवाडी संमेलन के अध्यक्ष अॅड. सुशील व्यास, पूनम कनौजिया, डायमंड मर्चंटचे संजय शाह, दिलीप साकेरिया,
निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर, वराय मोहम्मद, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख, प्रशांत झवेरी, समर्थलाल मेहता, सौरव शेट्टी, अॅड. त्र्यंबक तिवारी, कांती मेहता, उदेश अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, कैलास मुरारका, आदींनी आज शिंदे गटात प्रवेश केला.