मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी झाली. आज भल्या पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घऱी छापा टाकला होता. यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. आता त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं (ED) अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी जे जे रुग्णालयात पोहोचेले होते. जेजे रुग्णालयात मेडिकल करण्यात आल्यानंतर त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं की, यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचं हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही,” असही शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे