मुंबई : टाळेबंदी मुळे भरडलेल्या चित्रपट सृष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या बॅंक खात्यामध्ये अभिनेता सलमान खानने पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती चित्रपट कामगार संघटनेचे अध्यक्ष बी एन तिवारी यांनी दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय सलमान खानने घेतला आहे.
आतापर्यंत रोजंदारी करणाऱ्या 23 हजार कामगारांची सूची सलमान खानला दिली आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत केली आहे. प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून 1.5 कोटी रुपयांची मदत मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एक लाख कामगारांना शिधा देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत जमा झालेले 3 कोटी रुपये 5 लाख कामगारांमध्ये वाटले जाणार आहेत. 14 एप्रिल पासून टप्प्याटप्प्याने कामगारांना पैसे दिले जाणार आहेत, असेही तिवारी यांनी सांगितले.