मुंबई – अनेक बॉलीवूड चित्रपट सध्या एकामागे एक प्रदर्शित होत आहे. यातील अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. तर काही चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र अनेक चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने याचा चित्रपटांना काहीसा कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही टक्कर टाळण्यासाठी अनेक निर्मात्यांनी त्यांचा चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता अभिनेता वरुण धवननेही दिग्दर्शक करण जोहरसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
वरुण धवनचा ‘बवाल’ हा चित्रपट २७ जुलै रोजी ‘ॲमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट २७ जुलै ऐवजी २१ जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होईल. याचे मुख्य कारण म्हणजे २८ जुलै रोजी करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वरुण धवनने यासाठी चित्रपटाच्या टीमला विनंती केल्याचे म्हंटले जात आहे. अखेर त्याची विनंती मान्य करत ‘बवाल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. त्यानुसार आता बवाल’ हा चित्रपट २१ जुलैला आणि करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, ‘बवाल’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच वरुण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘बवाल’ ही प्रेमकथा आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ ते पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा येथे या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर आणि स्टंटमॅन यांना जर्मनीतून नेमण्यात आले होते. चित्रपटाच्या क्रूमध्ये 700 हून अधिक लोक होते.